बीड
गोदापात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा; शिवसेनेचे नारायण शिंदे यांनी घेतला ‘जलसमाधी’ घेण्याची पवित्रा

गोदापात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा; शिवसेनेचे नारायण शिंदे यांनी घेतला ‘जलसमाधी’ घेण्याची पवित्रा
गेवराई (प्रतिनिधी) : गेवराई तालुक्यातील नागझरी गोदावरी नदीपात्रात रात्रंदिवस केणी, हायवा यांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा जोरात सुरू असल्याची गंभीर तक्रार शिवसेना उपजिल्हाप्रमुख अॅड. नारायण आप्पासाहेब शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या अवैध उपशामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, महसूल प्रशासन मात्र डोळे झाक करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अॅड. शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेवराई तहसीलदार आणि तलाठी यांना वारंवार फोन करून अवैध उपसा थांबवण्याची विनंती केली, तरीही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. उलट तहसीलदार फोन उचलत नाहीत आणि वाळू माफियांना अभय देत असल्याचा दावा केला. “फोन केला तर वाळू माफिया आमच्या अंगावर पाठवतात, ज्यामुळे माझ्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. काही बरे-वाईट झाले तर तहसीलदार जबाबदार राहतील,” असे ते म्हणाले.याशिवाय घरकुल धारकांच्या नावे ओटीपीद्वारे अवैध वाळू उपसा चालू असल्याचा गंभीर आरोप करताना, ग्रामसेवक-तलाठी यांच्याकडून अँगल कॅम आणि फोटोसह पंचनामा घेण्याची मागणी केली. यातून तहसीलदारांनी किती मोठ्या प्रमाणात अवैध विक्री केली याचे उघड होईल, असा दावा आहे.
सर्वात धक्कादायक म्हणजे, अवैध उपसा तात्काळ थांबवला नाही तर दि. १ एप्रिल २०२६ रोजी गोदावरी नदीपात्रात जलसमाधी घेणार असल्याची भीषण धमकी अॅड. शिंदे यांनी दिली आहे. “याची सर्वस्वी जबाबदारी महसूल प्रशासनाची राहील,” असे ते म्हणाले.या निवेदनाच्या प्रती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार, विभागीय आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आल्या आहेत.
गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीत अवैध वाळू उपसा ही जुनी समस्या असून, यापूर्वीही अनेकदा कारवाया झाल्या आहेत. मात्र, माफियांचा दबाव वाढत असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणात तातडीने कारवाई होईल की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



