बीड
जायकवाडीच्या पाण्यासाठी आज महाएल्गार पाटाच्या पाण्याशिवाय शेतकऱ्यांच्या मुलांचे भविष्य उज्वल होणार नाही

जायकवाडीच्या पाण्यासाठी आज महाएल्गार
पाटाच्या पाण्याशिवाय शेतकऱ्यांच्या मुलांचे भविष्य उज्वल होणार नाही
बीड, प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतीला जायकवाडी धरण व कृष्णा खोर्याचे पाणी मिळत नसल्याने शेती व शेतकरी सातत्याने संकटात आहे. शेती व शेतकऱ्यांची ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्या शेतीला जायकवाडी धरणाचे हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, या पाण्याशिवाय शेतकऱ्यांच्या मुलांचे भविष्य उज्वल होणार नाही, शेतीला हक्काचे पाणी मिळावे यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शुक्रवारी होणाऱ्या महाएल्गार बैलगाडी मोर्चात तरुण, शेतकरी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन लोकलढा आंदोलनाच्या समन्वयकांनी केले. ते, गेवराई तालुक्यातील तरटेवाडी व दिमाखवाडी येथे बोलत होते.
बीड जिल्ह्यातील बहुतांश भागातील शेतीला जायकवाडी धरणाचे हक्काचे व जीवंत पाणी मिळत नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने दुष्काळात पिचला जातो. फळबाग, ऊस, भाजीपाला असे पीक घतल्यानंतर पाऊस कमी झाल्यास पीके जळून जातात, ऐनवेळी विहिरी, बोअर यांचे पाणी कमी होत असल्याने बारमाही बागाईत शेती अडचणीत येते. यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने संकटात आहेत. यातुनच शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्जबाजारीपणा, शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, ऊसतोड कामगारांच्या समस्या, रोजगारासाठी स्थलांतर असे अनेक प्रश्न समोर येतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी व शेतकर्यांच्या मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी आपल्या शेतीला हक्काचे जायकवाडी धरणाचे पाणी मिळावे, अशी भूमिका लोकलढा आंदोलनाच्या समन्वयकांनी मांडली. या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आववाहनही लोकलढा आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुन्हा पन्नास वर्षे पाणी मिळणार नाही
गेवराई तालुक्यातील चकलांबा, तांदळा, मातोरी, कोळगाव, मादळमोही, सिरसमार्ग, पाडळसिंगी, पाचेगाव ते तालखेडपर्येंतच्या शिवाराच्या पाच ते वीस किमी अंतरावरुन जायकवाडी धरणाचा उजवा कालवा गेला आहे. गेल्या पन्नास वर्षांत श्री क्षेत्र भगवान गड ते माजलगाव पर्यंतच्या शेतीला जायकवाडी धरणाचे पाणी मिळाले नाही. आता शासन १६८ टीएमसी पाण्याचे नियोजन करीत आहे. या पाण्यातही वंचित भागाला हक्काचे पाणी मिळाले नाही तर पुन्हा पन्नास वर्षे आपल्या शेतीला हक्काचे पाणी मिळणार नाही, अशी खंतही यावेळी लोकलढा समन्वयकांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे
शेतीला हक्काचे पाणी मिळावे यासाठी लोकलढा आंदोलनच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून सतत लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू आहे. गोदावरी-सिंदफणा नदीजोड प्रकल्प गतीने व्हावा, यासाठी सर्वे करावा आदी मागण्यांसाठी आज बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले आहे. या शेतकरी, शेतकरी पुत्रांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन लोकलढा आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे.



