वीजपुरवठा, सौर पंप आणि ट्रान्सफॉर्मर प्रश्नांवर आ. सुरेश धस आक्रमक

वीजपुरवठा, सौर पंप आणि ट्रान्सफॉर्मर प्रश्नांवर आ. सुरेश धस आक्रमक
मतदारसंघातील उपकेंद्रे व ट्रान्सफॉर्मर तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, वीज ग्राहक व ग्रामीण भागातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विविध प्रलंबित व महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी आष्टी तालुक्यातील दादेगाव, बीडसांगवी तसेच पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे मंजूर झालेल्या नवीन ३३/११ के.व्ही. उपकेंद्रांची कामे तातडीने पूर्ण करून कार्यान्वित करावीत, अशी मागणी त्यांनी केली. या उपकेंद्रांमुळे परिसरातील शेतकरी व वीज ग्राहकांना होणाऱ्या वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्या कमी होऊन वीजपुरवठा अधिक सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच आष्टा हरिनारायण, पोखरी आणि संबंधित ३३/११ के.व्ही. उपकेंद्रांवर मंजूर झालेला नवीन ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर तातडीने बसविण्यात यावा, जेणेकरून परिसरातील शेतकऱ्यांना उच्च दाबाने व अखंडित वीजपुरवठा मिळेल, अशी मागणीही त्यांनी केली.आष्टी मतदारसंघात जलसंधारण, शेततळे, सिंचन विहिरी, बंधारे तसेच विविध कृषी सिंचन योजनांमुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढली असून कृषी पंपांच्या वीज जोडण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांनुसार शेतकऱ्यांना आवश्यक विद्युत रोहित्रे उपलब्ध करून देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती आमदार धस यांनी केली.
यावेळी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सौर कृषी पंप योजनांबाबतही चर्चा करण्यात आली. सौर पंपांची क्षमता, पाण्याचा दाब व शेतकऱ्यांच्या गरजा यामध्ये योग्य समन्वय साधून लाभार्थ्यांना अधिक प्रभावी सेवा मिळावी, यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.
तसेच महावितरणच्या “ईडीबी (EDB)” योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील वाढत्या वीज मागणीच्या अनुषंगाने ६३ केव्हीए क्षमतेच्या रोहित्रांऐवजी १०० केव्हीए व २०० केव्हीए क्षमतेची नवीन रोहित्रे उपलब्ध करून देण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली.
यासंदर्भात महावितरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, महापारेषण विभागाचे अधिकारी तसेच सौर पंप प्रणालीचे मुख्य कार्याधिकारी यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करून शेतकऱ्यांच्या वीज व सौर पंपासंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येतील, असा विश्वास आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला.



