बीड
श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान बेलगाव येथे उत्तराधिकारी व सचिवपदी महंत शांतीब्रह्म तुकाराम महाराज भारती यांची निवड; लिंबागणेशकरांकडून भव्य मिरवणूक व सत्कार सोहळा

श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान बेलगाव येथे उत्तराधिकारी व सचिवपदी महंत शांतीब्रह्म तुकाराम महाराज भारती यांची निवड; लिंबागणेशकरांकडून भव्य मिरवणूक व सत्कार सोहळा
—–
लिंबागणेश (दि.२८): बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान, बेलगाव या प्राचीन व ऐतिहासिक संस्थानच्या उत्तराधिकारी पदी व सचिव पदाची सूत्रे महंत शांतीब्रह्म तुकाराम महाराज भारती यांच्याकडे सोपविण्यात आली. या निवडीचे स्वागत करत लिंबागणेश गावात भाविकांच्या वतीने जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्यावेळी बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. महादेव महाराज भारती तसेच गुरूवर्य धर्मराज दादा सामनगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिरवणुकीदरम्यान डोल-ताशे, ढोल-लेझीम, टाळ-मृदुंगाचा गजर आणि भगव्या पताक्यांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. “शांतीब्रह्म महाराज की जय” या घोषणांनी गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील तरुण मंडळींनी विशेष परिश्रम घेतले. प्रतिष्ठित नागरिक आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या महंतांचे उत्साहात स्वागत केले.
“निस्वार्थी सेवेमुळे संस्थानचा विकास” – गुरूवर्य धर्मराज दादा सामनगावकर
या प्रसंगी बोलताना गुरूवर्य धर्मराज दादा सामनगावकर म्हणाले की,
“श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान हे भाविकांच्या श्रद्धेचे स्थळ असून निस्वार्थपणे परमार्थासाठी जीवन समर्पित करणारे महात्मे लाभल्याने संस्थानचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. महंत तुकाराम महाराज भारती यांनी दिंडी सेवा व कार्यातून संस्थेची सेवा केली आणि भाविकांना एकत्रित करण्याचे कार्य केले. अगोदर सेवा आणि त्यानंतर कारभार हाती घेतल्याने भाविकांचा विश्वास वाढला आहे. सर्व मान्यवर संतांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. सेवाभावातून बेलेश्वर संस्थेची महती व विकास याला निश्चितच गती मिळेल.”
नव्या महंतांच्या निवडीमुळे संस्थानच्या धार्मिक व सामाजिक कार्याला अधिक दिशा व गती मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.



