बीड
मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करलासमध्ये ‘महिला कुणबी समाज व्यावसायिक सभागृहा’चे लोकार्पण

मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करलासमध्ये ‘महिला कुणबी समाज व्यावसायिक सभागृहा’चे लोकार्पण
स्मशानभूमी रस्ता व सभागृहासाठी ११ लाखांचा निधी; श्रीवर्धनमध्ये तटकरेंचा झंझावाती दौरा
श्रीवर्धन (संदेश घोलप):
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु. आदिती वरदा सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन तालुक्यातील विविध ग्रामीण भागांचा दौरा केला. या दौऱ्यात करलास गावातील ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीला यश आले असून, मंत्री महोदयांच्या हस्ते नूतन ‘महिला कुणबी समाज व्यावसायिक सभागृहा’चे उद्घाटन आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
मंत्री आदिती तटकरे यांचे करलास गावात आगमन होताच ग्रामस्थांनी आणि कुणबी समाज बांधवांनी लेझीम, ढोल-ताशा आणि सनई-चौघड्यांच्या निनादात त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी महिलांनी मोठी गर्दी केली होती. “आदिती ताई आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
कामाची पोचपावती मिळाली – आदिती तटकरे
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आदिती तटकरे म्हणाल्या की, “एखादे काम मंजूर होणे ही पहिली पायरी असते, पण ते काम लोकांच्या अपेक्षेनुसार आणि वेळेत पूर्ण होणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचे कर्तव्य आहे. आज करलास गावातील महिला आणि ग्रामस्थांचे हे अफाट प्रेम पाहून आपण काहीतरी चांगले काम करतोय याची पोचपावतीच मला मिळाली आहे. महिला सभागृहामुळे गावातील भगिनींना रोजगाराच्या व प्रशिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध होतील.”
गावातील विकासकामांसाठी मंत्री महोदयांनी एकूण ११ लाख रुपयांचा निधी दिला आहे. यात स्मशानभूमी रस्त्यासाठी ६ लाख आणि महिला कुणबी समाज व्यावसायिक सभागृहासाठी ५ लाख रुपयांचा समावेश आहे.
श्रीवर्धन तालुकाध्यक्ष पदी निवड झालेले मंदार तोडणकर आणि सभापती सुचिन किर यांचा पद मिळाल्यानंतरचा हा तालुक्यातील पहिलाच अधिकृत दौरा होता. आपल्या सहकाऱ्यांच्या या पहिल्या दौऱ्याबद्दल मंत्री महोदयांनी आनंद व्यक्त केला.
या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष मंदार तोडणकर, सभापती सुचिन किर, पंचायत समिती सदस्य सौ. वासंती गुणाजी तसेच करलास गावातील स्थानिक पदाधिकारी, कुणबी समाजाचे मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होता.



