प्रधानमंत्री आवास योजनेत सहभागी व्हा; आमदार नमिता मुंदडा यांचे नागरिकांना आवाहन

प्रधानमंत्री आवास योजनेत सहभागी व्हा; आमदार नमिता मुंदडा यांचे नागरिकांना आवाहन
अंबाजोगाई प्रतिनिधी – “प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. केज विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक पात्र कुटुंबाने या संधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन आमदार नमिता मुंदडा यांनी केले आहे.
आमदार मुंदडा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले की, सध्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्व्हे प्रक्रिया सुरु आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत किंवा स्वतः सेल्फ सर्व्हे करून नागरिकांना आपली नोंदणी करता येणार आहे. एक ते दहा निकषांमध्ये पात्र ठरणाऱ्या व कच्चे घर असलेल्या नागरिकांनी या योजनेत आपले नाव नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ३० एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून, वेळेत नोंदणी करून घराचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
नोंदणी प्रक्रिया अशी करा
नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून ‘Aawas Plus 2024’ हे अधिकृत अॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर ‘Aadhar Face rd’ अॅपही इंस्टॉल करून आपली ओळख पडताळावी. यानंतर, आवश्यक माहिती भरून, कच्च्या घराचा व प्रस्तावित घराच्या जागेचा फोटो अपलोड करावा. आधार व जॉब कार्डची पडताळणी करून संपूर्ण सर्व्हे अपलोड करावा.
“ही योजना केवळ घराचे स्वप्न पूर्ण करण्याची नव्हे, तर आत्मनिर्भरतेकडे उचललेले एक मोठे पाऊल आहे,” असे आमदार नमिता मुंदडा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.



