
घोगस पारगांवचा प्रविण सगळे सेट परीक्षा उत्तीर्ण
घोगस पारगांव (प्रतिनिधी): श्री क्षेत्र भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या घोगस पारगांवमधील सामान्य शेतकरी कुटुंबातील प्रविण नवनाथ सगळे याने मोठ्या मेहनतीने व जिद्दीने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी सेट उत्तीर्ण केली आहे. प्रविणचे दहावीपर्यंतचे शिक्षण माध्यमिक विद्यालय घोगस पारगाव येथे झाले. त्याने इयत्ता दहावीला 91.80% गुण मिळवले होते. त्यानंतर त्याचे अकरावी व बारावीचे शिक्षण सायन्स रेसिडेन्शियल जुनियर कॉलेज शेवगाव येथे झाले. बारावीला त्याने 72% गुण घेत यशाची पायरी चढत असल्याची चुणूक दाखवून दिली होती. पुढे पदवी अभ्यासक्रमासाठी त्याने श्री संत भगवानबाबा महाविद्यालय, घाटशीळ पारगांव येथे प्रवेश घेऊन प्रथम श्रेणीने पदवी परीक्षा उत्तीर्ण झाला. पदव्युत्तर पदवीसाठी त्याने राज्यशास्त्र विषय घेऊन पुणे येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स येथे प्रवेश घेतला. तेथे त्याने 74% घेऊन पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर पुढे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणाऱ्या सेट परीक्षेचाही त्याने अभ्यास केला व त्यामध्ये 72 गुण (कट ऑफ पेक्षा 13 गुण जास्त) घेऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. यासोबतच सध्या तो स्पर्धा परीक्षा देण्यासाठी एमपीएससी व यूपीएससीचाही अभ्यास करत आहे. प्रवीणच्या या यशाबद्दल समस्त घोगस पारगांववकर ग्रामस्थांनी त्याचे व परिवाराचे तोंड भरून कौतुक केले. त्याने घेतलेली यशाची उंच भरारी नक्कीच इतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे. या यशासाठी त्याला श्री. देवकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.



