बीड

लिंबागणेशमध्ये मयुरेश्वराचे राजेशाही थाटात विसर्जन; २२५ वर्षाची एक गाव एक गणपती परंपरा  ; गौरी बरोबरच गणेशाचे विसर्जन त्यामुळे गणेशोत्सव ५ दिवसांचा 

लिंबागणेशमध्ये मयुरेश्वराचे राजेशाही थाटात विसर्जन; २२५ वर्षाची एक गाव एक गणपती परंपरा  ; गौरी बरोबरच गणेशाचे विसर्जन त्यामुळे गणेशोत्सव ५ दिवसांचा
——-
लिंबागणेश:- ( दि.०२ ) सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र भालचंद्र गणपती तिर्थक्षेत्र असलेल्या बीड तालुक्यातील लिंबागणेश गावात “एक गाव – एक गणपती” ची २२५ वर्षांपासून परंपरा आहे. सरकार वाड्यात प्रतिष्ठापित  मयुरेश्वर गणेशाची आज ता.२ मंगळवार रोजी आज दुपारी बारा वाजता मुख्य आरती केल्यानंतर छत्री,चौरी,अब्दगिरी,चामर,ध्वज,दंड अशा राजेशाही थाटात सरकार वाड्यातुन मयुरेश्वराची पालखीतुन विसर्जन मिरवणूक सुरू झाली. सरकार वाड्याच्या बाहेर आल्यानंतर बॅण्ड पथक, टाळ मृदंगाच्या गजरात भजनी मंडळींनी ठेका धरत तसेच ढोल ताशाच्या गजरात लेझीम पथकातील तरूणांनी आपले कसब दाखवले.मिरवणुकीसमोर परीट समाजातील बांधव धोतराच्या पायघड्या घालतात.”मोरया हो मोरया ” “जय गजानन मोरया “चा जयघोष आसमंतात दुमदमला. मिरवणुकीत परीसरातील १२ गावातील लेझीम पथकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. रात्री ९ वाजता भालचंद्र गणपती मंदिराच्या चंद्र पुष्करणी तिर्थात महाआरतीनंतर विसर्जन करण्यात येते.
पालखीसमोर धोतराच्या पायघड्याचा मान परीट समाजाचा तर सजवलेल्या बैलगाडीचा मान कैकाडी समाज बांधवांचा
——
मयुरेश्वराच्या विसर्जन मिरवणुकीत पालखी समोर धोतराच्या पायघड्या अंथरूण स्वागत करण्याचा मान परीट समाज बांधवांचा असतो तर गावातील मारोती मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी कैकाडवाड्यात सजवलेल्या बैलगाडीत मयुरेश्वराची मुर्ती पंचक्रोशीतील भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येते. हा मान कैकाडी समाज बांधवांचा असतो.
मयुरेश्वर मुर्तीकार उमेश कानिटकर तर मुर्तीसाठी चिखलाचे गोळे मुळुक येथील महादेव आहेरकर पुरवतात
——
गणेशचतुर्थीला षोडशोपचार पुजा करून सरकार वाड्यात मयुरेश्वर गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.वंशपरंपरेने उमेश कानिटकर ही गोजिरी मुर्ती तयार करतात.नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी मुर्तिकाम सुरू होऊन श्रावण वैद्य त्रयोदशीला पुर्ण होते.पोळ्याच्या दुसऱ्या दिवसापासून रंगकाम सुरू होते. मयुरेश्वराच्या मुर्तीसाठी चिखलाचे गोळे पुरवण्याचा परंपरागत मान मुळुक गावचे महादेव आहेरकर यांचा आहे.
गौरी बरोबरच गणेशाचे विसर्जन त्यामुळे ५ दिवसा़चा गणेशोत्सव
—-
मागील २२५ वर्षांपासून लिंबागणेश गावाने “एक गाव – एक गणपती” परंपरा जपली आहे.गौरीबरोबरच गणेशाचे विसर्जन करण्याची इथे परंपरा असल्याने येथील गणेशोत्सव ५ दिवसांचा असतो. गावात दुसरीकडे सार्वजनिक गणपती बसवला जात नाही हे या गावचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नेकनुर ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक चंद्रकांत गोसावी, पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे,लक्ष्मण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बाबासाहेब राख, गोविंद बडे, ,पोह.क्षीरसागर,घुंगरट, ढाकणे,खाडे यांच्यासह एकुण ३० पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Back to top button