बोगस ॲपच्या जाळ्यातून बेरोजगारांना वाचवा; उपाययोजना तत्काळ लागू करा!

बोगस ॲपच्या जाळ्यातून बेरोजगारांना वाचवा; उपाययोजना तत्काळ लागू करा!
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश
ॲड. निरंजन डावखरे यांच्या लक्षवेधी सूचनेनंतर बैठक
मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी विधानभवन, मुंबई येथे विधान परिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी पावसाळी अधिवेशन २०२५ मध्ये लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या “बोगस ॲपच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांची होणारी फसवणूक” या गैरव्यवहार संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस विधानपरिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे, गृह विभागाचे सहसचिव श्री. राहुल कुलकर्णी, पोलीस उपआयुक्त श्री. बजरंग बनसोडे, तसेच सायबर विभागाचे श्री. प्रविण बनगोसावी आदी उपस्थित होते.
बैठकीत समोर आले की, राज्यात काही बोगस ॲप राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे चिन्ह वापरून तयार केली जात आहेत. या ॲपद्वारे बेरोजगार तरुणांना विविध प्रकारचे आमिष दाखवून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक केली जाते. काही काळानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित तरुणांकडून पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या जातात; मात्र त्या वेळी तक्रारींवर विलंबाने कार्यवाही केली जाते, किंवा काही ठिकाणी त्या नोंदवून घेतल्या जात नाहीत, अशी गंभीर परिस्थिती बैठकदरम्यान समोर आली.
या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला की, अशा प्रकारच्या फसवणुकींवर कठोर प्रतिबंध घालण्यासाठी आणि गुन्हेगारांना वेगाने गाठण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली येत्या १५ दिवसांत विशेष बैठक घेण्यात यावी. बोगस ॲपच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांची होणारी फसवणूक ही अत्यंत गंभीर बाब असून, अशा प्रकारच्या घटनांवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे निर्देश महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी दिले आहेत.
शेवटी, या बैठकीत असे मत व्यक्त करण्यात आले की, राज्यातील तरुणांची फसवणूक रोखण्यासाठी आणि डिजिटल माध्यमांद्वारे होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी सक्षम आणि कार्यक्षम व्यवस्था निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.



