बीड

भाषेवरील सांस्कृतिक व राजकीय आक्रमण चिंताजनक – प्रा.डाॅ.गणेश मोहिते

भाषेवरील सांस्कृतिक व राजकीय आक्रमण चिंताजनक – प्रा.डाॅ.गणेश मोहिते
[संमेलनाध्यक्षपदी डाॅ.राजेश गायकवाड]

अहिल्यानगर (प्रशांत बाफना) : राज्य शासनाने शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचा नुकताच आदेश काढला होता. परंतु या निर्णयाला सर्वच स्तरातून जोरदार विरोध झाल्यानंतर सरकार बचावात्मक भुमिकेत गेले आणि हिंदी भाषा सक्तीची नसून ऐच्छिक करण्यावर सध्या विचार सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले. महानगरातील मराठी शाळांची स्थिती अतिशय चिंताजनक असून बहुतांश शाळा बंद पडल्या आहेत. महाराष्ट्रातील ‘एकता’सारख्या वेगवेगळ्या संस्थांनी एकत्र येत मराठी भाषा वाचवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत असे आवाहन मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर चे सहकार्यवाह प्रा.डाॅ.गणेश मोहिते यांनी केले. जागतिक पुस्तक दिनानिमित्त एकता फाउंडेशन आयोजित ३८ व्या राज्यस्तरीय ऑनलाईन एकता काव्य संमेलनाच्या उद्घाटक पदावरून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई चे सदस्य डाॅ.राजेश गायकवाड हे होते.
एकता फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य जेष्ठ साहित्यिक अनंत कराड, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर, प्रदेश प्रवक्ता मल्हारी खेडकर, प्रदेश संघटक देवीदास शिंदे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा.डाॅ.प्रकाश वाकळे, परभणी जिल्हा उपाध्यक्षा मेघा नांदखेडकर, महानगरीय अध्यक्षा प्रा.शोभाताई घुंगरे, पाथर्डी तालुकाध्यक्ष राजेंद्र उदारे, राहुरी तालुका सचिव बाळासाहेब मुंतोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२३ एप्रिल रोजी एकताचे राज्यस्तरीय काव्य संमेलन संपन्न झाले त्यामध्ये अशोक गुट्टे (हिंगोली) यांनी ‘बहरून आली प्रित’ ही रचना ऐकवून रसिकांची वाहवा मिळवली. परभणीचे जेष्ठ शेतकरी कवी आत्माराम कुटे यांनी ‘दलालानं लुटलं’ व ‘पिक हे मोत्याचं’ या कवितेतून शेतकऱ्यांची व्यथा उजागर केली. बाळ पाटील (धाराशीव) यांनी ‘ज्यांचे घोडे आज्ञापालक नव्हते’ व ‘कोणी कशात गेला’ या उत्तम गझला पेश करत माहोल तयार केला. धुळ्याचे प्रेमचंद अहिरराव यांच्या ‘कणव’ व ‘चारा छावणी’ या कवितांनी धमाल उडवून दिली. बीड चे अंकुश नागरगोजे यांनी ‘कलावती परतून माघारी’ व ‘आयुष्य जगताना’ या बहारदार कविता रसिकांना ऐकवल्या तर मालेगाव जि.नाशिक येथील युवा गझलकार कुणाल शिरोडे याने ‘फाटके आयुष्य आहे’ व जेव्हा कुठे जराशी’ या एकसे बढकर एक गझला ऐकवत उपस्थितांची वाहवा मिळवली. प्रशांत गवई (अकोला) या कवीने ‘मह्या गावातली पाहुणी’ व ‘काळजी’ या वर्‍हाडी भाषेतील रचना पेश करून टाळ्या मिळवल्या. वाई जि.सातारा येथील जेष्ठ कवयित्री मिरा देवळालीकर यांनी ‘पुस्तकाचे मनोगत’ ही समायोचित रचना सादर केली. राहुरी जि.अहिल्यानगर चे बाळासाहेब मुंतोडे यांनी ‘मेघराजा’ या कवितेतून पावसाची आळवणी केली तर प्राचार्य डाॅ.राजेंद्र कोबारणे यांनी ‘पाश’ ही लक्षवेधी रचना रसिकांसमोर ठेवली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकता फाउंडेशन राहुरी तालुका प्रतिनिधी प्राचार्य डाॅ.राजेंद्र कोबारणे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थी आघाडीचा प्रतिनिधी सुरज कदम (पिंपळनेर) याने केले. देवीदास शिंदे यांनी बहारदार सूत्रसंचालन करत धमाल उडवून दिली. कार्यक्रमास एकता फाउंडेशन शिरूर तालुका विद्यार्थी आघाडी प्रमुख कार्तिक चकंबळे, दादाराव वाल्हेकर, दर्शन मुंतोडे, बाबू कुटे, मनिषा पंधारे, मनमोहन खेडकर, नामदेव गित्ते, राजू नागरगोजे, शिवाजी नामपल्ले, साहिल वैरागकर, विठ्ठल चव्हाण यांच्यासह अनेक कवी कवयित्री उपस्थित होते.

[चौकट- संमेलनाच्या सुरवातीलाच पहलगाम (काश्मीर) येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर जो भ्याड हल्ला केला त्याचा एकमुखी निषेध करून हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना मौन धारण करत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.]
Back to top button