बीड

जामखेडमधून बच्चुभाऊंच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा

जामखेडमधून बच्चुभाऊंच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा

आमचे कपडे घ्या, पण शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांच्या मागण्या मान्य करा – प्रहार जनशक्ती पक्षाचे तहसीलदारांना निवेदन

जामखेड प्रतिनिधी:-प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चुभाऊ कडू यांचे मागील पाच दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन अद्याप सुरू असून शासनाने त्यांच्या मागण्यांकडे अद्यापही दुर्लक्ष केले आहे. या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यात बच्चुभाऊ कडू यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी विविध स्वरूपातील आंदोलने करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

याच अनुषंगाने जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी तहसीलदारांच्या दालनात आपले शर्ट काढून सरकारला थेट संदेश दिला – “आमचे कपडे घ्या, पण शेतकरी व दिव्यांगांच्या मागण्या मान्य करा!” शासनाने जर लवकरात लवकर बच्चुभाऊ कडू यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर जामखेड तालुक्यातही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला.

प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युम शेख म्हणाले, “आम्ही या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी जामखेड तालुक्यात विविध स्वरूपाची आंदोलने करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या दिलेल्या शब्दाला जागावे, अन्यथा गावपातळीवर दोन दिवसांत तीव्र आंदोलन उभारले जाईल. आमचे कपडे घ्या, पण शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांच्या मागण्या मान्य करा,असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले म्हणाले, “बच्चुभाऊ कडू यांनी ‘न भूतो, न भविष्य’ असा लढा शेतकरी व दिव्यांगांसाठी उभारलेला आहे. याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. आजचा शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असून शासनाने कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा. तसेच दिव्यांग बांधवांना मासिक सहा हजार रुपयांची मदत तात्काळ सुरू करावी. सरकारने निवडणुकांपूर्वी याचे आश्वासन दिले होते, पण ते अद्याप पूर्ण झालेले नाही.”

या दोन प्रमुख मागण्यांसोबत आणखी १५ मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांत निर्णय न झाल्यास राज्यासह जामखेडमध्येही आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युम शेख, जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले, शहराध्यक्ष दिनेश राळेभात, प्रमोद खोटे, संजय मोरे, विजय क्षिरसागर, सचिन जाधव, सुरेश नेटके, रमेश कोल्हे, सचिन उगले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button