धनेगाव मध्ये आषाढी सोहळ्याची जय्यत तयारी ; सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार महापूजा

धनेगाव मध्ये आषाढी सोहळ्याची जय्यत तयारी ; सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार महापूजा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धनेगाव (धाकटी) पंढरीत उपस्थित राहणार…
जामखेड प्रतिनिधी –जामखेड तालुक्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या धनेगाव येथे गेली अनेक वर्षांपासून आषाढी एकादशी उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो. यंदाही उत्सवासाठी विविध गावांमधून दिंड्या येणार असून, गावातील हिंदू-मुस्लीम नागरिक एकत्र येऊन हा सोहळा साजरा करतात, ही या गावाची खासियत आहे.
धनेगाव येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष भरत (बाप्पा) काळे आणि संचालक मंडळाने भाविकांना उपस्थित राहून दर्शन व फराळाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या उत्सवात गेली ४० वर्षांपासून हभप रमेश (महाराज) साबळे तिंत्रज येथून दिंडी घेऊन येतात. तसेच प्रा. मधुकर राळेभात यांची दिंडी मागील १९ वर्षांपासून जामखेड शहरातील श्रीकृष्ण मंदिरातून येते. जवळका, वाघा, ब्रह्माणपूर, वाकी आदी गावांमधूनही वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात.
सकाळी ११ वाजता ग्रामप्रदक्षिणा व रिंगण सोहळा होणार आहे. फराळ व इतर सुविधा ट्रस्ट व ग्रामस्थांच्या मदतीने योग्य प्रकारे केली गेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सोमनाथ पवार यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तर मनोहर टिपरे यांनी एलईडी लाइट्स बसविल्या आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे, यंदा या महापूजेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार रोहित पवार, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मंत्रालयीन सचिव कृष्णा जाधव, तसेच प्रा. मधुकर राळेभात, प्रा. सचिन (सर) गायवळ, अमोल राळेभात, मंगेश आजबे आणि शिवसेना नेते राजेंद्र फाटक उपस्थित राहणार आहेत.
या पारंपरिक आणि ऐक्याचे प्रतीक असलेल्या उत्सवाला धनेगावकरांनी भाविक भक्तांचे स्वागत करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.



