बीड

१३ फेब्रुवारी “जागतिक रेडिओ” दिन. आकाशवाणी रेडिओ भूतकाळाची आठवण नसून भविष्याचा विश्वास…

१३ फेब्रुवारी “जागतिक रेडिओ” दिन.

आकाशवाणी रेडिओ भूतकाळाची आठवण नसून भविष्याचा विश्वास…
——–

आकाशवाणी ही भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व आहे. भारतात रेडिओ प्रसारणाची सुरुवात १९२७ मध्ये झाली. १९३६ मध्ये ‘ऑल इंडिया रेडिओ’ची अधिकृत स्थापना झाली आणि १९५७ पासून ‘आकाशवाणी’ हे नाव प्रचलित झाले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशातील जनतेपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि त्वरित माहिती पोहोचवणे हा तिचा मुख्य उद्देश होता.

आकाशवाणीचे ध्येय केवळ बातम्या देणे नव्हते, तर शिक्षण, संस्कृती, संगीत, लोककला,नाटक, ग्रामीण विकास, शेतीविषयक मार्गदर्शन आणि सामाजिक जागृती यांद्वारे समाज घडवणे हा तिचा व्यापक हेतू होता. देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध भाषा, परंपरा आणि कला यांना व्यासपीठ देत राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याचे मोठे कार्य आकाशवाणीने केले.

पूर्वी रेडिओ हा घरातील एक जिव्हाळ्याचा सदस्य होता. सकाळच्या प्रार्थना, दुपारच्या बातम्या, संध्याकाळची गीते आणि विशेष कार्यक्रम यामुळे कुटुंब एकत्र येत असे. त्या आवाजात विश्वास आणि आत्मीयता होती. आज डिजिटल युगात तंत्रज्ञान बदलले असले, तरी आकाशवाणीची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि लोकांशी असलेले भावनिक नाते कायम आहे.

आकाशवाणीने अनेक कलाकार, साहित्यिक आणि विचारवंतांना व्यासपीठ दिले, नव्या पिढीला प्रेरणा दिली आणि समाजमन घडवले. ज्ञान, संस्कृती आणि मनोरंजन यांचा समतोल साधत देशाच्या प्रगतीत हातभार लावणारी ही संस्था आजही तितकीच सशक्त आहे.

येत्या काळात नव्या पिढीनेही या समृद्ध परंपरेत आपला सर्जनशील सहभाग नोंदवावा, आधुनिक विचार आणि तंत्रज्ञानाची जोड देत आकाशवाणीचा वारसा अधिक समृद्ध करावा, ही अपेक्षा आहे. कारण आकाशवाणी ही केवळ भूतकाळाची आठवण नसून भविष्याचा विश्वासही आहे.”

ज्ञान आणि मनोरंजनाची जयावाणी आकाशवाणी…

*- प्रीती सवई-पगारे,  रेडिओ जॉकी, आकाशवाणि केंद्र बीड*

Back to top button