बीडब्रेकिंगमहाराष्ट्र

पठाण मांडवा येथील तीनशे एकर जमिन गेली वाहून, शेतकऱ्यांना भरीव अनुदान मिळावे

अँड. अजित देशमुख यांची पाहणीनंतर मागणी

अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा या गावात एका नदी पात्राचे तीन नदी पात्र झाले आहेत. त्यामुळे तिनशे ते पाचशे एकर जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. यातील साधारणतः तिनशे एकर जमीन वाहून गेली असून याठिकाणी नदीतील दगडधोंडे पडलेले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना तात्काळ भरीव स्वरूपाची मदत देण्याची मागणी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केली आहे.

येथील शेतकऱ्यांना सोबत घेऊन या परिसरात साधारणतः चार तास पायी फिरल्यानंतर अँड. देशमुख यांनी शेतकऱ्यांविषयी चिंता व्यक्त केली. अनेक अल्पभूधारक शेतकरी आता भूमिहीन झाल्याचे या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे बिकट परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना ताबडतोब मदतीची गरज आहे.

या दौऱ्यानंतर तहसीलदार बिपीन पाटील त्यांच्याशी ही देशमुख यांनी संवाद साधला असून या ठिकाणचे पंचनामे लवकरात लवकर करण्याची विनंती केली आहे. तहसीलदारांनी याकडे लक्ष देण्याचे मान्य केले आहे. शेतकऱ्यांच्या ऊस, फळबागा आणि अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांच्या जमिनीचा उरल्या नाहीत. विहिरी, बोअर देखील बुजले आहेत. विजेचे पोल वाहून गेले आहेत

शेतकऱ्यांचे हाल पहायचे असतील तर परिसरात खाली उतरून फारल्याशिवाय ते कळत नाहीत. वर पुलावर उभे राहून अथवा एखाद्या बांधावरुन पाहणी करून हे दुःख कळण्यापलीकडचे आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक बांधावर जाणे गरजेचे आहे.

अँड. सुभाष शिंदे, विष्णु जाधव, सुधाकर जाधव, बिडवे सर, रामेश्वर जाधव यांचे सह अन्य सर्व शेतकरी या पाहणीच्या वेळी उपस्थित होते. काही शेतकऱ्यांनी पाहणी दरम्यान आपल्या शेतीची आणि पिकाची वर्णन करून शेतीच राहिली नसल्यामुळे टाहो फोडला. हे सर्व चित्र हृदयद्रावक असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पहावे. शासनाने या शेतकऱ्यांना भरीव स्वरूपाची मदत करावी, अशी मागणी अँड. देशमुख यांनी यावेळी केली आहे.

Back to top button