बीड

“हमारा शौचालय, हमारा भविष्य” मोहीम कागदोपत्रीच

“हमारा शौचालय, हमारा भविष्य” मोहीम कागदोपत्रीच

जिल्हा परिषद कार्यालयात शौचालय स्वच्छता करत गांधीगिरी आंदोलन
– डॉ. गणेश ढवळे

बीड : (दि. १५)बीड जिल्हा परिषद अंतर्गत दि. १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणारी “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहीम केवळ कागदोपत्रीच राबविण्यात आल्याचा आरोप करत, तिच्या निषेधार्थ जिल्हा परिषद मुख्य कार्यालयात आज गांधीगिरी पद्धतीने ‘शौचालय स्वच्छता मोहीम’ राबविण्यात आली.

हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांमध्ये आजही अनेक ठिकाणी शौचालयांचा अभाव असून, काही ठिकाणी असलेली शौचालये वापरण्यायोग्य नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांची शारीरिक व मानसिक कुचंबणा होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

या आंदोलनादरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, बीडचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड,जिल्हाध्यक्ष अशोक येडे ( जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), नितिन सोनावणे ( महाराष्ट्र प्रवक्ता तथा जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना बीड),  सय्यद सादेक ( बीड शहराध्यक्ष आम आदमी पार्टी)
बीड माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनूस, सुदाम तांदळे, शेख मुबीन सहभागी होते.

सविस्तर माहिती

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून दि. १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत बीड जिल्ह्यातील १३५६ गावांमधील वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची तपासणी, दुरुस्ती व रंगरंगोटी करून ती वापरात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच उमेद विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केले आहे. मात्र प्रत्यक्षात ही मोहीम कागदोपत्रीच राबविण्यात येत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

आजही अनेक शाळा व अंगणवाड्यांमध्ये शौचालयांचा अभाव असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना शौचालयासाठी घरी जावे लागते किंवा उघड्यावर जाण्याची वेळ येते, ही गंभीर बाब आहे.

प्रमुख मागण्या

जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांमध्ये वस्तुस्थितीचा सर्वेक्षण अहवाल तयार करावा

आवश्यक ठिकाणी नवीन शौचालयांची बांधणी करावी

नादुरुस्त शौचालयांची तातडीने दुरुस्ती व रंगरंगोटी करावी

मोहीम केवळ कागदोपत्री न ठेवता प्रत्यक्षात प्रभावी अंमलबजावणी करावी

Back to top button