📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

लोणी येथे बांधावरील गवत जाळल्याने उसाला आग ७० हजारांचे नुकसान – दोघांवर गुन्हा दाखल

लोणी येथे बांधावरील गवत जाळल्याने उसाला आग

७० हजारांचे नुकसान – दोघांवर गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी :
जामखेड तालुक्यातील लोणी येथे शेजाऱ्याने बांधावरील गवत जाळताना घेतलेल्या निष्काळजीपणामुळे शेजारील शेतकऱ्याचा उभा ऊस जळून खाक झाला. या आगीत सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली असून, खर्डा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी गाव हद्दीत शेत गट क्रमांक ९५ मधील बांधावरील गवत जाळताना आग नियंत्रणाबाहेर गेल्याने ती शेजारील शेतात पसरली. यामध्ये गंगाधर महादेव परकड (वय ७५, रा. लोणी, ता. जामखेड) यांच्या शेतातील सुमारे २० गुंठे ऊस जळून खाक झाला. या घटनेत अंदाजे ७० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

याप्रकरणी गंगाधर परकड यांनी खर्डा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ११/०५/२०२६ रोजी दुपारी सुमारे दीड वाजता सुबराम नाना शेंडकर (रा. लोणी) यांनी शेत गट क्रमांक ९५ च्या बांधावरील गवत जाळण्यासाठी आग लावली होती. त्यातून आग पसरून परकड यांच्या उसाला लागली.

घटनेनंतर नुकसान भरपाई मागितली असता, ती देण्यास नकार देत वाद निर्माण झाला. तसेच सुबराम शेंडकर यांच्या पत्नी उजना शेंडकर यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी सुबराम नाना शेंडकर व उजना सुबराम शेंडकर (रा. लोणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खर्डा पोलीस करीत आहेत.

Back to top button