बीड
गरीबांच्या घरकुलांसाठी रेतीचा तुटवडा; ‘स्वतःच्या आशियानाचे स्वप्न’ धूसर

गरीबांच्या घरकुलांसाठी रेतीचा तुटवडा; ‘स्वतःच्या आशियानाचे स्वप्न’ धूसर
दै, सूर्योदय पवनी:- भंडारा जिल्ह्यातील प्रत्येकाला स्वतःचं घर असावं, आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित आशियाना उभा करावा, ही मानवाची मूलभूत इच्छा. ‘निवारा’ ही मानवी जीवनातील तीन मूलभूत गरजांपैकी एक महत्त्वाची गरज असून, त्या घरकुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेली रेती मात्र अलीकडे टंचाईत आली आहे.
रेती तस्करीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने अलीकडे कठोर पावले उचलली असली, तरी त्याचा फटका प्रत्यक्षात गरिबांनाच बसताना दिसत आहे. अधिकृतपणे रेती उपलब्ध नसल्याने घरकुल बांधणीसाठी पात्र असलेल्या गरीब कुटुंबांना, गरजूंना तसेच लहानशा बांधकामासाठी रेतीची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु बाजारात उपलब्धता कमी असल्याने अनेकांच्या योजनांना अडथळा निर्माण होत आहे.
“रेती मिळाली नाही, तर स्वतःच्या आशियानाचं स्वप्न स्वप्नच राहील,” अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत. काही ठिकाणी ग्रामीण भागात शासकीय योजनांचा लाभ मिळालेला असूनही रेती अभावी कामे रखडलेली आहेत. बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक ताण अधिक जाणवत आहे.
स्थानिक प्रशासनाने गरजूंसाठी परवडणाऱ्या दरात आणि सुलभ पद्धतीने रेती उपलब्ध करून देण्यासाठी ठोस धोरण आखावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी जोर धरत आहे. अन्यथा ‘स्वतःच्या घराचे स्वप्न’ अनेकांसाठी केवळ कागदावरच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


