आष्टी तालुक्यातील पाणीटंचाईवर आ. सुरेश धस यांचा सविस्तर आढावा; टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठ्याच्या सूचना

आष्टी तालुक्यातील पाणीटंचाईवर आ. सुरेश धस यांचा सविस्तर आढावा; टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठ्याच्या सूचना
आष्टी, प्रतिनिधी : आष्टी तालुक्यात निर्माण होऊ घातलेल्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेत तालुक्यातील पाणीस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी गावनिहाय उपलब्ध पाणीसाठा, आरक्षित पाणीसाठ्याची स्थिती तसेच ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अलनिनोच्या प्रभावामुळे शेतकऱ्यांनी पेरणीबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने आष्टी तालुक्यात संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले. काही गावांसाठी पाणी टँकर मंजूर करण्यात आले असून, उर्वरित गरजू गावांनाही वेळेत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
बैठकीत मेहकरी, कडा, कडी आणि कांबळी या प्रकल्पांमध्ये आरक्षित पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती संबंधित विभागांकडून देण्यात आली. या प्रकल्पांमधून टंचाईग्रस्त गावांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना आमदार धस यांनी केल्या. तसेच पावसाचा विलंब झाल्यास आणि पाणीटंचाईची तीव्रता वाढल्यास परिस्थितीनुसार तातडीच्या उपाययोजना राबविण्याबाबतही चर्चा झाली.
या बैठकीस तालुका महसूल व दंडाधिकारी सौ. वैशाली पाटील, महावितरणचे उपअभियंता श्री. देशमुख, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. सिनारे, पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. सदगर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आगामी काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहून समन्वयाने काम करण्याचे निर्देश आमदार सुरेश धस यांनी यावेळी दिले.



