रायगड

रायगडात पर्यटनाला उधाण, उन्हाळी पर्यटनाचा अखेरचा हंगाम, जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बहरली,

रायगडात पर्यटनाला उधाण,
उन्हाळी पर्यटनाचा अखेरचा हंगाम,
जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बहरली,

विशेष प्रतिनिधी (धम्मशील सावंत)

जैवविविधतेने
नटलेले विलोभनीय निसर्ग सौंदर्य व विस्तीर्ण समुद्र किनारा तसेच ऐतिहासिक व धार्मिक स्थळे यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्याकडे वळतात. संपूर्ण मे महिन्यात पावसामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. आता पावसाने थोडी उसंत घेतली आहे तसेच उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यामधील पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली आहेत. उन्हाळी पर्यटनाचा हा अखेरचा टप्पा असून 4 ते 5 दिवसांनी पर्यटकांची पावले परतीच्या मार्गाला लागतील.
पुणे-मुंबईसह महाराष्ट्र व राज्याबाहेरील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांची पावले जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळतात. यंदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने मे महिन्याच्या अखेर पर्यंत देखील पर्यटकांची फारशी गर्दी नव्हती. मात्र सध्या सर्व ठिकाणी पर्यटकांची गर्दी आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबुन असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, छोटे-मोठे दुकानदार, वाहतूकदार, राईड्सवाले यांची सध्या चलती आहे. पर्यटकांच्या वाहनांमुळे मुंबई गोवा महामार्ग, पाली खोपोली राज्य महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई बैंगलोर महामार्ग आदी मार्गांवर गर्दी होत आहे. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील पहायला मिळत आहे. हॉटेल देखील आगाऊ बुक करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण माथेरानला देखील पर्यटक आता गर्दी करत आहेत. अष्टविनायकांपैकी दोन गणपती हे रायगडमध्ये आहेत. ते म्हणजे खालापुर तालुक्यातील महडचा वरदविनायक आणि सुधागड तालुक्यातील पालीचा बल्लाळेश्वर, सध्या येथे भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर शिवप्रेमी मोठया संख्येने येत आहेत. राज्याभिषेक दिनीदेखील रायगडावर हजारो शिवप्रेमी आले होते. मुरुड आणि अलिबाग समुद्रकिनार्‍याची मजा लुटतांनाच पर्यटक येथे असलेल्या कुलाबा किल्ल्याला आवर्जून भेट देत आहेत. दक्षिण काशी म्हणुन ओळखल्या जाणार्‍या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वरला पर्यटकांसह भाविकांचीही पसंती असते. कारण एकाच ठिकाणी भव्य समुद्र किनारा आणि देवदर्शन अशा दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम तेथे साधता येतो.

Back to top button