बीड

मिलीया शाळेच्या अनधिकृत भागशाळा दंडासह बंद करा -अशोक तावरे

मिलीया शाळेच्या अनधिकृत भागशाळा दंडासह बंद करा -अशोक तावरे

बीड (प्रतिनिधी):- मिलीया शाळेने जिल्हा परिषद शिक्षण विभागाची कसलीही परवानगी न घेता  अनधिकृतपणे सुरू केलेल्या भागशाळा या दंडासह बंद करण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांचे कडे केली आहे
 याबाबत शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनानंतर काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात अशोक तावरे यांनी म्हटले आहे की, जिल्हा परिषद शिक्षण विभागाची कसलीही परवानगी न घेता मिलीया प्रशासनाने बीड शहरांमध्ये तीन ठिकाणी आपल्या शाळेच्या भागशाळा अनधिकृत पणे सुरू केल्या, गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या अनाधिकृत भागशाळा सुरू असून जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षण अधिकारी श्री एच.ए. कराड यांनी याबाबत या शाळांना भेटी देऊन त्या अनाधिकृत असल्याचे व त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये असे दिनांक 24.11.2010 रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. परंतु तरी देखील गटशिक्षणाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे कार्यालय केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार गेल्या पंधरा वर्षापासून करत आहेत. मिलीया प्रशासनाने मात्र शिक्षण विभागाला व त्यांच्या आदेशांना फाट्यावर मारत या अनाधिकृत भागशाळांमध्ये अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भरती केलेली आहे. त्यातून अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत असून या भागशाळा अनाधिकृत असताना या ठिकाणी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरण्याची परवानगी शिक्षण विभागाच्या कुठल्या अधिकार्‍याने दिली. तसेच शिक्षणाधिकार्‍यांचे आदेश असताना देखील गेल्या पंधरा वर्षापासून अनाधिकृत भागशाळा शिक्षण विभागातील कुठल्या अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. तत्कालीन शिक्षणाधिकार्‍यांचे आदेश असतानाही या अनाधिकृत भाग शाळा बंद का होत नाहीत या पाठीमागे मोठे गोड बंगाल आहे. येत्या आठ दिवसांमध्ये शिक्षण विभागाने या अनाधिकृत भाग शाळा दंडासह बंद कराव्यात तसेच या अनाधिकृत भागशाळांच्या  ठिकाणी भरती केलेली नोकर भरती ही रद्द करावी याबाबत आपण शिक्षणाधिकारी यांना विनंती केली आहे. शिक्षण विभागाने यावर कार्यवाही न केल्यास याविषयी आपण माननीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे दाद मागण्यासह शिक्षण विभागाच्या विरोधामध्ये तीव्र असे आंदोलन उभा करणार असल्याचे अशोक तावरे यांनी म्हटले आहे.

Back to top button