बीड

उपक्रमशील शिक्षिका शेख शाहिदा बेगम यांना ‘राजमाता जिजाऊ स्मृती शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार’ जाहीर!

उपक्रमशील शिक्षिका शेख शाहिदा बेगम यांना ‘राजमाता जिजाऊ स्मृती शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार’ जाहीर!

बीड (प्रतिनिधी) गेली २७ वर्षे तळागाळातील, गरीब आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या मोमीनपुरा (बीड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील  शिक्षिका शेख शाहिदा बेगम अब्दुल रहीम यांना यंदाचा अत्यंत मानाचा “राजमाता जिजाऊ स्मृती ‘शैक्षणिक कार्य गौरव’ राज्यस्तरीय पुरस्कार २०२६” जाहीर करण्यात आला आहे. ‘साप्ताहिक युवा लोकमित्र’च्या ५ व्या वर्धापन दिन व ६ व्या वर्षात पदार्पण सोहळ्यानिमित्त उच्चस्तरीय पुरस्कार निवड समितीने त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
शेख शाहिदा बेगम यांनी आपल्या २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात जिल्हा परिषदेच्या शाळेत खऱ्या अर्थाने ‘डिजिटल क्रांती’ घडवून आणली. ई-लर्निंग, स्मार्ट क्लास आणि प्रोजेक्टरच्या प्रभावी वापरातून त्यांनी नवोपक्रमशील अध्यापन पद्धती विकसित केल्या. कोविड-१९ च्या कठीण काळातही त्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देता ऑनलाइन शिक्षण अत्यंत प्रभावीपणे चालू ठेवले. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शाळेचा निकाल १००% लागण्यासोबतच अनेक गुणवंत विद्यार्थी घडले.राजमाता जिजाऊंच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेत शाहिदा बेगम यांनी शाळाबाह्य मुलांना शोधून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे सामाजिक कार्य केले आहे. मुलींच्या शिक्षणासाठी राबवलेले विशेष उपक्रम, विशेष गरज असलेल्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांसाठीचे समावेशक शिक्षण आणि गरीब विद्यार्थ्यांना दिलेले मोफत स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन, यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या खऱ्या अर्थाने आधारवड ठरल्या आहेत.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विज्ञान प्रदर्शन, क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन घवघवीत यश मिळवून दिले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतही त्यांच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.समाज आणि शाळा यांची नाळ जोडत शाहिदा बेगम यांनी पालक-शिक्षक संवाद अत्यंत मजबूत केला. लोकसहभागातून निधी उभारून त्यांनी शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. केवळ पुस्तकी ज्ञान न देता वृक्षारोपण, स्वच्छता आणि पर्यावरण जनजागृती असे उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक व संविधानिक मूल्यांची रुजवणूक केली.
त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी २०१२ मध्ये ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ (स्काऊट गाईड कॅप्टन), २०१७ मध्ये ‘समाजसेवक पुरस्कार’, २०१७ मध्ये ‘कर्नाटक राज्य स्काऊट गाईड कॅप्टन पुरस्कार’ आणि २०१९ मध्ये ‘अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ पुरस्कार’ अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.२० जून रोजी भव्य सोहळ्यात होणार सन्मान
हा राज्यस्तरीय गौरव सोहळा येत्या शनिवार, २० जून २०२६ रोजी संध्याकाळी ०६:०० वाजता ‘ताज पॅलेस’, कादरपुरा, बार्शीनाका, बीड येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे. या दिमाखदार कार्यक्रमाला राजकीय, प्रशासकीय, आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याच शुभहस्ते शेख शाहिदा बेगम यांना हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केला जाईल.

||चौकट||

“राजमाता जिजाऊंनी स्वराज्याचे बीज रोवले, तशीच शिक्षणाची आणि संस्कारांची बीजे शेख शाहिदा बेगम या त्यांच्या जि. प. शाळेत रोवत आहेत. मुलींचे शिक्षण, डिजिटल साक्षरता आणि लोकसहभागातून त्यांनी जो आदर्श निर्माण केला आहे, तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक आहे. या महान कार्यासाठी त्यांना ‘राजमाता जिजाऊ स्मृती शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार’ जाहीर करताना ‘युवा लोकमित्र’ परिवाराला सार्थ अभिमान वाटत आहे.”

Back to top button