📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

अनुसूचित जातीचा ३९९ कोटींचा निधी वळवला; बहुजन समाज पार्टी आक्रमक !

अनुसूचित जातीचा ३९९ कोटींचा निधी वळवला; बहुजन समाज पार्टी आक्रमक !

 नांदेड (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या निधीसाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती घटकातील महिलांसाठी आरक्षित असलेला तब्बल ३९९ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती आहे.
         मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी असलेला हक्काचा निधी इतरत्र वळवण्यात आल्याने दलित व सामाजिक संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या निर्णयाच्या निषेधार्थ बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री तसेच संबंधित शासनाला इमेलद्वारे तातडीचे लेखी निवेदन पाठवले आहे. तसेच राज्य शासनाच्या संबंधित पोर्टलवर अधिकृत तक्रारही नोंदवण्यात आली आहे.
           इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे की, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या विरोधात आपण नाही, मात्र मागासवर्गीय व दलित घटकांच्या हक्काचा निधी अशा प्रकारे परस्पर वळवणे हे थेट संवैधानिक अधिकारांवर आघात करणारे आहे. याचा बहुजन समाज पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे.
          सामाजिक न्याय विभागाचा निधी अशा प्रकारे वळवल्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, वसतिगृहे, कौशल्य विकास योजना तसेच इतर महत्त्वपूर्ण कल्याणकारी योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
           यापूर्वीही अनुसूचित जाती घटकांच्या हक्काच्या निधीसाठी संघर्ष करावा लागत असताना उपलब्ध निधी अन्य योजनांसाठी वापरला जात असल्याने मूळ घटकांच्या विकासाला मोठी खीळ बसण्याची भीती या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. यासाठी बहुजन समाज पक्षाने शासनाकडे प्रमुख मागण्या केल्या आहेत :
       (१) मागासवर्गीय घटकांच्या विकासाचा निधी इतर योजनांसाठी वळवणे तात्काळ थांबवावे. (२) सामाजिक न्याय विभागाचा निधी केवळ आणि केवळ संबंधित मागासवर्गीय घटकांच्या हक्कांसाठी पूर्णपणे सुरक्षित ठेवावा. (३) वळवण्यात आलेला निधी संबंधित अनुसूचित जाती घटकांच्या योजनांसाठी तातडीने पूर्ववत करावा. (४) सर्व मागासवर्गीय महामंडळाना जास्तीचा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा.(५) सर्व मागासवर्गीय महामंडळाचे थकित कर्ज माफ करण्यात यावे.
         शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर बहुजन समाज पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्य सचिव, सामाजिक न्याय विभाग, पुणे आणि मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
*_*_*&*&*&*&*+()/+-
गुरुद्वारा बोर्ड कायद्यातील प्रस्तावित बदलांना बसपाचा विरोध; सुखबीरसिंह बादल यांच्यावरील हल्ल्याचा निषेध !
        नांदेड, दि. (प्रतिनिधी) : तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा बोर्ड ॲक्ट १९५६ मधील प्रस्तावित दुरुस्ती व गुरुद्वारा बोर्डाच्या प्रशासकीय आणि धार्मिक स्वायत्ततेमध्ये होणाऱ्या शासकीय हस्तक्षेपाला बहुजन समाज पार्टीच्या नांदेड जिल्हा पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे; तसेच पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री व शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सरदार सुखबीरसिंह बादल यांच्यावर नांदेड येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
          या संदर्भात बहुजन समाज पार्टीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा बोर्ड ॲक्ट १९५६ मध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या दुरुस्तीमुळे गुरुद्वारा बोर्डाच्या प्रशासकीय व धार्मिक स्वायत्ततेमध्ये शासकीय हस्तक्षेप वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे शीख समाजामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. धार्मिक संस्थांची स्वायत्तता आणि त्यांची पारंपरिक लोकशाही व्यवस्था अबाधित ठेवली पाहिजे. त्यामुळे गुरुद्वारा बोर्डाच्या कारभारातील अनावश्यक शासकीय हस्तक्षेप तातडीने थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

*सुखबीरसिंह बादल यांच्यावरील हल्ल्याचा निषेध*
          शीख समाजाच्या धार्मिक हक्कांच्या समर्थनासाठी आले असता नांदेड येथील गुरुद्वारा माता साहिब देवाजी परिसरात शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष व पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सरदार सुखबीरसिंह बादल यांच्यावर दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या हल्ल्याचाही तीव्र निषेध करण्यात आला आहे.
          हा हल्ला अत्यंत दुःखद, चिंताजनक आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचे बहुजन समाज पार्टीने म्हटले आहे. हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार व असामाजिक तत्त्वांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी आणि दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
*जातीयवादी मानसिकतेविरोधातही भूमिका*
           देशात घडणाऱ्या जातीयवादी घटनांचा तसेच दलित व शोषितांच्या हक्कांवर होणाऱ्या अतिक्रमणाचा बहुजन समाज पार्टीने तीव्र निषेध केला आहे. समाजातील सर्व घटकांच्या धार्मिक व सामाजिक अधिकारांचे संरक्षण करणे ही शासनाची घटनात्मक जबाबदारी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
          गुरुद्वारा बोर्डाची स्वायत्तता, कायदा-सुव्यवस्था आणि शीख समाजाच्या धार्मिक भावनांचा विचार करून हे निवेदन केंद्र व राज्य शासनाकडे तातडीने पाठवावे आणि नांदेड येथील हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
          मागण्या मान्य न झाल्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर बहुजन समाज पार्टीचे मराठवाडा झोन तथा महाराष्ट्र प्रभारी मनीषभाऊ वैजनाथराव कावळे, महाराष्ट्र प्रदेश सचिव इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, नांदेड जिल्हाध्यक्ष सुभाष भोकरे, नांदेड उत्तर विधानसभा प्रभारी रमेश लोणे, जिल्हा प्रभारी शिवाजी सोनटक्के, नांदेड महानगर अध्यक्ष अनिकेत आळंदीकर, जिल्हा कार्यालय सचिव नारायण घुले, नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्ष जय पंडित आणि गंगाचाळ सेक्टर अध्यक्ष सचिन गौतम गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Back to top button