📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

धनगर वस्ती शाळेतील उपक्रमशीलतेचा आदर्श; क्षेत्रभेटीत शिक्षकांनी घेतली प्रेरणा

धनगर वस्ती शाळेतील उपक्रमशीलतेचा आदर्श; क्षेत्रभेटीत शिक्षकांनी घेतली प्रेरणा

जामखेड : पाटोदा(ग.) केंद्रातील तसेच तालुक्यातील देवदैठण येथील जि. प. प्राथमिक शाळा धनगर वस्ती येथे शिक्षकांसाठी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. या वेळी केंद्रप्रमुख राम निकम, माजी व्हाईस चेअरमन सीमा क्षीरसागर/ निकम, ग्रेड मुख्याध्यापक सुनील कुमटकर, शिक्षिका उर्मिला उगले, सुजाता राक्षे,निता तांबे तसेच शिक्षक नेते विनोद सोनवणे, जितेंद्र आढाव, अनिल आष्टेकर, उपेंद्र आढाव,राजीव मडके, नारायण लहाने,शिरिष कदम,नवनाथ बहिर, जालिंदर राऊत, शेखर घुमरे यांच्यासह केंद्रातील सुमारे ५० शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.

यावेळी उपक्रमशील शिक्षक लहू बोराटे यांनी अतिदुर्गम व डोंगराळ भागातील शाळेचा सीएसआर निधी आणि लोकसहभागातून केलेला कायापालट शिक्षकांनी प्रत्यक्ष पाहिला.

शाळेच्या परिसरात विविध दुर्मिळ वनस्पती, परसबाग, खेळाचे मैदान, हँडवॉश स्टेशन, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वयंपाकगृह, स्टोअर रूम तसेच मुला-मुलींसाठी स्वतंत्र व सुविधायुक्त स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

शाळेतील सर्व शैक्षणिक अभिलेखे व्यवस्थित व अद्ययावत ठेवण्यात आलेले दिसून आले. तसेच इंटरॲक्टिव्ह पॅनेल, खेळाचे साहित्य आणि संगणक प्रयोगशाळेचीही प्रभावी मांडणी करण्यात आली आहे. या सुविधांसोबतच विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, स्व-अध्ययनाची सवय आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जाणीव विकसित झाल्याचे क्षेत्रभेटीदरम्यान दिसून आले. विद्यार्थ्यांचे सुंदर हस्ताक्षरही उपस्थित शिक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले.

धनगर वस्ती शाळेतील विविध उपक्रम व शैक्षणिक वातावरण पाहून केंद्रातील सुमारे ५० शिक्षकांनी प्रेरणा घेत आपल्या शाळांमध्येही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

अतिदुर्गम भागातील शाळेला सीएसआर निधी व लोकसहभागातून विविध सुविधा उपलब्ध करून देत शैक्षणिक गुणवत्तेला चालना देणाऱ्या शिक्षक लहू बोराटे यांच्या उपक्रमशील कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.

Back to top button