बीड
बदामराव पंडितांनी घेतली पंकजाताईंची भेट निवडणुकीसह मतदारसंघातील कामांबाबत चर्चा

बदामराव पंडितांनी घेतली पंकजाताईंची भेट
निवडणुकीसह मतदारसंघातील कामांबाबत चर्चा
गेवराई ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी मुंबई येथे भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसह गेवराई विधानसभा मतदारसंघातील विविध कामांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती माजी सभापती युधाजित पंडित यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश घेण्यात आलेला आहे. या प्रवेशानंतर पहिल्यांदाच मुंबई येथे राज्याच्या पशुसंवर्धन पर्यावरण आणि हवामान बदल कॅबिनेट मंत्री तथा भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांची माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी भेट घेतली. यावेळी बीड जिल्हा परिषद चे माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित, युवा नेते रोहित पंडित यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये गेवराई नगर परिषद आणि पंचायत समितीसह जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी, त्यासोबतच गेवराई विधानसभा मतदारसंघातील विविध कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. भाजपा पक्ष संघटन बांधणी यासोबत शहरासह ग्रामीण भागात भागातील पदाधिकाऱ्यांना बळ आणि स्वाभिमान देण्याच्या संदर्भातही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती माजी सभापती युधाजित पंडित यांनी दिली असून, या बैठकीतून भाजप पक्ष विस्तार आणि जनतेच्या सेवेसाठी नवी ऊर्जा निश्चित मिळाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.



