📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

लातूर जिल्ह्यातील ३०० हून अधिक विद्यार्थी ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेत सहभागी होणार

लातूर जिल्ह्यातील ३०० हून अधिक विद्यार्थी ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेत सहभागी होणार
➖➖➖➖➖➖➖➖
लातूर, दि. ९ ऑक्टोबर २०२६ :
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, उपकेंद्र, लातूर यांच्या वतीने लातूर जिल्हास्तरीय ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेचे आयोजन ९ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयांमधील ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार असून, विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांचे पोस्टरच्या माध्यमातून सादरीकरण करणार आहेत.
या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे मा. कुलगुरू प्रा. डॉ. मनोहर जी. चासकर राहणार आहेत. कार्यक्रमास नवोपक्रम, इनक्युबेशन व लिंकेजेस विभागाचे संचालक डॉ. शैलेश जे. वाधेर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे कार्यक्रम संचालक डॉ. नागोबा शिवप्पा एन., संचालक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, लातूर असून, जिल्हा आविष्कार समन्वयक डॉ. प्रमोद पाटील हे स्पर्धेचे समन्वयक म्हणून कार्य पाहत आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, नाविन्यपूर्ण व सर्जनशील कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच संशोधनाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.
‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेमध्ये विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, औषधनिर्माण व वैद्यकीय क्षेत्र, कृषी व पशुसंवर्धन, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी, मानवविद्या, भाषा व ललित कला आदी विविध ज्ञानशाखांतील संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण होणार आहे.
सहभागी विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांचे तज्ज्ञ परीक्षकांकडून परीक्षण करण्यात येणार असून, उत्कृष्ट संशोधन प्रकल्पांची पुढील स्तरावरील‘आविष्कार’ स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या संशोधन कार्याचे तज्ज्ञांसमोर सादरीकरण करण्याची तसेच संशोधनातील नवनवीन संकल्पना, पद्धती आणि निष्कर्षांची देवाणघेवाण करण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे.
लातूर जिल्ह्यातील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग ही या स्पर्धेची विशेष बाब असून, जिल्ह्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधनाची वाढती रुची आणि विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संशोधन क्षमतेचे हे द्योतक आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक, विविध महाविद्यालयांचे आविष्कार समन्वयक, तज्ज्ञ परीक्षक तसेच आयोजन समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.
— आविष्कार आयोजन समिती
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, उपकेंद्र, लातूर
Back to top button