📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आ. सुरेश धस यांच्या पुढाकाराचा सकारात्मक परिणाम; महाआरोग्य शिबिरातून रुग्णांना नवजीवन

आ. सुरेश धस यांच्या पुढाकाराचा सकारात्मक परिणाम; महाआरोग्य शिबिरातून रुग्णांना नवजीवन
शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथील सुभाष केदार यांच्यावर ५ लाखांपर्यंतची मणक्याची शस्त्रक्रिया मोफत
आष्टी (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यदूत आमदार सुरेश आण्णा धस यांच्या संकल्पनेतून ६ ऑगस्ट रोजी आष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिराचा सकारात्मक परिणाम आता प्रत्यक्ष रुग्णांच्या जीवनावर दिसून येत आहे. शिबिरात तपासणी करून निवड झालेल्या गरजू रुग्णांवर विविध रुग्णालयांत मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. याच उपक्रमातून शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथील सुभाष देवराव केदार यांच्यावर अहिल्यानगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या गादीची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली.
वारणी येथील सुभाष केदार हे महाआरोग्य शिबिरासाठी आले असता त्यांच्या आजाराची तातडीने दखल घेण्यात आली. कार्यकर्ते श्रीराम केदार यांनी त्यांच्या उपचाराबाबत आमदार सुरेश धस यांच्याकडे माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ आवश्यक मदत व उपचाराची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सुभाष केदार यांना १० ऑगस्ट २०२६ रोजी अहिल्यानगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर मणक्याच्या गादीची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि उपचारानंतर १५ ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
या उपचारासाठी अंदाजे ४ लाख ५० हजार ते ५ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत संपूर्ण उपचाराचा खर्च झाल्याने केदार कुटुंबावर कोणताही आर्थिक भार पडला नाही. विशेष म्हणजे रुग्णालयातील नोंदणीसाठी भरलेली ५५० रुपयांची फी देखील परत करण्यात आली. त्यामुळे महागडी शस्त्रक्रिया होऊनही सुभाष केदार यांना उपचारासाठी अक्षरशः एक रुपयाही खर्च करावा लागला नाही.
चौकट
महाआरोग्य शिबिरातून आणखी दोन रुग्णांवर गुडघा सांधेरोपणाच्या शस्त्रक्रिया
आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून आयोजित महाआरोग्य शिबिरात निवड झालेल्या आणखी दोन गरजू रुग्णांवर अहिल्यानगर येथील साईदीप सह्याद्री रुग्णालयात गुडघा सांधेरोपणाच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या.
आष्टी तालुक्यातील कर्हेवडगाव येथील गोपीनाथ मारुती सानप आणि पाटोदा तालुक्यातील नफरवाडी येथील महादेव नरसिंग चव्हाण यांच्यावर गुडघ्याच्या मोफत शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या. साईदीप सह्याद्री रुग्णालयाचे चेअरमन डॉ. दीपक किरण यांच्या सहकार्याने डॉ. नालकर यांनी या शस्त्रक्रिया केल्या.
शस्त्रक्रियेनंतर सानप व चव्हाण यांनी आमदार सुरेश धस, डॉ. दीपक किरण, डॉ. नालकर तसेच उपचारासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. “आता आम्ही पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो,” अशी भावना व्यक्त करत त्यांनी महाआरोग्य शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले. रुग्णसेवक विकास साळवे व अमर वाळके यांनीही उपचार प्रक्रियेत मदत केली.
चौकट
आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी आ.सुरेश धस ठरताहेत आधार
आष्टी विधानसभा मतदारसंघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना महागड्या उपचारांसाठी आयुष्यमान भारत योजना, मुख्यमंत्री सहायता निधी तसेच इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी आमदार सुरेश धस यांचा पुढाकार महत्त्वपूर्ण ठरत आहे. आष्टीतील महाआरोग्य शिबिरात केवळ तपासणी न करता गंभीर आजार असलेल्या गरजू रुग्णांची निवड करून त्यांच्या पुढील उपचार व शस्त्रक्रियांची व्यवस्था केली जात असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
“महाआरोग्य शिबिर हे केवळ एक दिवसाचे शिबिर न राहता गरजू रुग्णांना प्रत्यक्ष उपचार मिळवून देणारे अभियान ठरत आहे,” अशी भावना रुग्णांच्या नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे.

Back to top button