बीड
महाराष्ट्र आधार सेनेच्या मागणीला यश; स्वाधार योजनेच्या अनुदानात मोठी वाढ

महाराष्ट्र आधार सेनेच्या मागणीला यश; स्वाधार योजनेच्या अनुदानात मोठी वाढ
रामदास आठवले साहेबांकडे महाराष्ट्र आधार सेनेने केली होती मागणी; ठिकाणानुसार ₹50 हजार ते ₹80 हजारांपर्यंत वार्षिक अनुदान
बीड : आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भोजन, निवास, निर्वाह व शैक्षणिक साहित्याचा खर्च भागविण्यासाठी महत्त्वाची ठरणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र आधार सेनेच्या वतीने दि. 5 ऑक्टोबर 2024 रोजी विद्यार्थी सेना, महाराष्ट्र आधार सेनेचे तालुकाध्यक्ष अभिषेक अडागळे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री मा. रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. स्वाधार योजनेचे वार्षिक अनुदान ₹70,000 करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली होती.
ग्रामीण व खेडेगावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी राहावे लागते. मात्र वाढत्या महागाईमुळे भोजन, निवास व शैक्षणिक साहित्याचा खर्च परवडत नसल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे महाराष्ट्र आधार सेनेने निवेदनातून शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.
📌 आता ठिकाणानुसार अनुदान
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई व नागपूर — ₹80,000
इतर विभागीय शहरे — ₹68,000
जिल्ह्याच्या ठिकाणी — ₹57,000
तालुक्याच्या ठिकाणी — ₹50,000
याशिवाय वैद्यकीय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी अतिरिक्त ₹8,000 देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या हक्काच्या मागणीला यश
स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ झाल्याने ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून देत महाराष्ट्र आधार सेनेने केलेली मागणी आणि पाठपुराव्याला मिळालेले हे यश असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
हा विजय कोण्या एका व्यक्तीचा नसून विद्यार्थ्यांचा आहे. महाराष्ट्र आधार सेनेने विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी केलेल्या मागणीला मिळालेला हा सकारात्मक प्रतिसाद आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी यापुढेही महाराष्ट्र आधार सेना सातत्याने आवाज उठवत राहील,” असे अभिषेक अडागळे यांनी सांगितले.



