बीड
माझे मूल, माझी जबाबदारी चा सूर; तपनेश्वर शाळेत पालक-शिक्षक मेळावा उत्साहात

माझे मूल, माझी जबाबदारी चा सूर; तपनेश्वर शाळेत पालक-शिक्षक मेळावा उत्साहात
शाळेतील भौतिक सुविधां व उपक्रमांवर मंथन
जामखेड प्रतिनिधी : तपनेश्वर परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी पालक-शिक्षक मेळावा खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, शाळेतील भौतिक सुविधांची पूर्तता, विद्यार्थी उपस्थिती तसेच पालक-शिक्षकांमधील सुसंवाद या विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
मेळाव्यास केंद्रप्रमुख कलिम शेख, नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव, नगरसेविका संगिता भालेराव, बांधकाम समितीचे सभापती मोहन पवार तसेच पालक संतोष नवलाखा, बाळासाहेब गायकवाड,अतुल खराडे, मोहसीन शेख, वसिम शेख, हनुमंत जाधव,अक्षय सदाफुले यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज पवार, मुख्याध्यापक मच्छिंद्र खैरे, उपाध्यापक प्रताप पवार, शिक्षिका शितल कदम, रूपाली कांबळे, कल्पना मोरे, स्वाती गोरे यांच्या सह माता पालक उपस्थित होत्या.
यावेळी मेळाव्यात नगरसेवक ॲड.डाॅ. अरुण जाधव,केंद्रप्रमुख कलिम शेख,पालक संतोष नवलाखा तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे धनराज पवार यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
शाळेतील मूलभूत भौतिक सुविधांचा प्रश्न यावेळी प्रामुख्याने चर्चेत आला. दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कंपाऊंड वॉल व एका वर्गखोलीचे काम तसेच मार्च २०२४ मध्ये मंजूर झालेल्या स्वच्छतागृहाचे काम जागेच्या वादामुळे अद्याप अपूर्ण असल्याची बाब चर्चेत मांडण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या व सुविधांच्या दृष्टीने या कामांचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
तसेच शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न, विद्यार्थ्यांची वाढती अनुपस्थिती, अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन प्रबोधन करणे, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शाळेतील विविध उपक्रमांमध्ये पालकांचा सहभाग यावरही चर्चा झाली.
वर्गनिहाय पालकांच्या ग्रुपवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व विविध उपक्रमांतील कृती नियमितपणे शेअर करणे, माता-पालकांची भूमिका व जबाबदारी, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी थेट शिक्षकांपर्यंत पोहोचविणे, याबाबतही पालकांनी सूचना मांडल्या.
बालक-पालक-शिक्षक यांच्यातील सुसंवादातूनच शाळेच्या गुणवत्तावाढीला गती मिळू शकते, यावर उपस्थितांचे एकमत झाले. शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी उपलब्ध मार्गांचा सकारात्मक पद्धतीने उपयोग करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा निर्धार पालकांनी व्यक्त केला.
मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा करताना मतभेदांपेक्षा विद्यार्थ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवून सन्मानपूर्वक मार्ग काढण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचा सकारात्मक सूर मेळाव्यात उमटला.
नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देत शैक्षणिक उपक्रमाला हातभार लावला. त्यांच्या या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने ॲड. डॉ. अरुण जाधव यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मच्छिंद्र खैरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रताप पवार यांनी केले, तर आभारप्रदर्शन केंद्रप्रमुख कलिम शेख यांनी मानले.
पालक-शिक्षक मेळाव्याची सांगता ज्येष्ठ अभिनेते तथा रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
चौकट
—————-
माझा मुलगा कलेक्टर तसेच विविध क्षेत्रातील पदावर काम करेल अशी जिद्द व सकारात्मक भूमिका प्रत्येक पालकाने ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी पालकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून, तपनेश्वर शाळेसाठी आवश्यक असलेल्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत,
_ ॲड. डॉ. अरुण जाधव
( नगरसेवक)



