गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करा – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करा – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड दि.09 (प्रतिनिधी)ः- विद्यार्थ्यांनी भविष्यात स्पर्धेचा काळ ओळखून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत उज्वल भविष्य घडविण्याचे प्रयत्न करावेत असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
सौ.के.एस.के. अन्नतंत्र व कृषि महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, युवा नेते हर्षद क्षीरसागर, सहसचिव गोविंद साळूंके, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी. मोरे, अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.झेड.एच. सय्यद, प्रा.डॉ.एस.टी. शिंदे, प्रा. डॉ. व्ही.बी. तागड, प्रा.पी.जी. पौळ, डॉ.जी.पी. राऊत, प्रा.के.डी. नागरगोजे, प्रा.डॉ.जी.एम.बोडखे, प्रा.डी.ए.मुटकुळे, प्रा.बी.आर. चादर, प्रा.एस.आर.मस्के, प्रा.ए.सी. गार्डी, एल.एम. बोंद्रे आदिंसह सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
हैद्राबाद येथील राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या स्नेहा दुधाळ हिचा सन्मान करण्यात आला तर आंतरविद्यापीठ महोत्सवात यश प्राप्त केलेल्या वेदांत स्वामी आणि अमित दळवी तसेच अभिजीत निकम या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची हैद्राबाद येथील राष्ट्रीय एकात्मता शिबीरासाठी निवड झाली. तसेच गिता परजने, वैष्णवी भोंडवे, श्रेया लांब, घोडके सुरेश, मळेकर आशिष आदि विद्यार्थ्यांचाही माजी मंत्री क्षीरसागरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना माजी मंत्री क्षीरसागर म्हणाले की, अन्नतंत्र व कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले ही अभिमानाची बाब आहे. आपल्या संस्थेचे नाव उज्वल करणार्या विद्यार्थ्यांना आपण प्रोत्साहन देत असतो. याच विद्यार्थ्यांची प्रेरणा घेऊन यश मिळवावे. विद्यार्थ्यांना भविष्य काळात स्पर्धेच्या युगात टिकवून रहायचे असेल तर गुणवत्तेला प्राधान्य द्यावे लागेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून यशाकडे वाटचाल करावी. उज्वल भविष्य घडवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून योग्य मार्गाकडे लक्ष केंद्रीत करणे महत्वाचे आहे. आपल्या आई-वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण उच्च शिक्षणाची वाट धरली आहे. यातून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्याला जमेल तो विषय आत्मसात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. अडचणी आणि अडथळे हे येतच असतात, जिद्द आणि इच्छा असेल तर यावरही मात करता येते. अनेक नव नवीन शोध लागू लागले आहेत. नवे प्रयोग पुढे येऊ लागले आहेत याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी पुढे जाणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, कर्मचारी उपस्थित होते.



