बीड

११ वी विज्ञान शाखा प्रवेश प्रक्रियेत मनमानी फी आकारणीविरोधात माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी आक्रमक

११ वी विज्ञान शाखा प्रवेश प्रक्रियेत मनमानी फी आकारणीविरोधात माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी आक्रमक
बीड | प्रतिनिधी
 इयत्ता ११ वी विज्ञान शाखेच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026 दरम्यान विविध विद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडून शासनमान्य शुल्कापेक्षा जादा फी आकारली जात असल्याच्या तक्रारी गंभीर स्वरूपात समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड व मा. जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मागील वर्षी काही विद्यालयांनी ११ वी विज्ञान शाखेच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांकडून २५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत मनमानी फी वसूल केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून आर्थिक शोषण होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
आम आदमी पार्टीने प्रशासनाकडे खालील माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे :
• इन-हाऊस कोटा किती टक्के आहे व त्या प्रवेशासाठी शासनमान्य शुल्क किती आहे.
• सर्वसाधारण गुणवत्ता यादीसाठी किती जागा राखीव आहेत व त्यासाठी अधिकृत फी किती आहे.
• मॅनेजमेंट कोटा किती टक्के आहे व त्या प्रवेशासाठी शासनमान्य शुल्क किती आहे.
ही सर्व माहिती अनुदानित व विनाअनुदानित विद्यालयांसाठी स्वतंत्रपणे जाहीर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच शासन नियमांचे उल्लंघन करून मनमानी फी आकारणाऱ्या विद्यालयांची सखोल चौकशी करून संबंधित संस्थांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान कॉपीमुक्तीसाठी ज्या प्रकारे भरारी पथके नेमली जातात, त्याच धर्तीवर ११ वी प्रवेश प्रक्रियेदरम्यान फी वसुलीची ऑन-द-स्पॉट तपासणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात विशेष तपासणी पथके नेमावीत, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.
तसेच पालकांसाठी तक्रार निवारण हेल्पलाईन सुरू करून शासनमान्य शुल्कापेक्षा जादा फी आकारणाऱ्या संस्थांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी दिला आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रफिक पठाण शहराध्यक्ष सय्यद सादेक डॉक्टर गणेश ढवळे सामाजिक कार्यकर्ते किसके ना पांचाळ सामाजिक कार्यकर्त्या कैलासचंद पालीवाल कोषाध्यक्ष आम आदमी पार्टी बाळासाहेब मोरे पाटील संस्थापक अध्यक्ष शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच नितीन सोनवणे मराठवाडा प्रवक्ता ऑल इंडिया पँथर्स गणेश आजबे नितीन जायभाय डीजे तांदळे सर संजय तांदळे शेख युनूस सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर शिंदे कृष्णाजी जगताप इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Back to top button