बीड
श्रीवर्धन-जीवना, दांडा बंदरात नौका किनाऱ्यावर; मच्छिमारांची लगबग वाढली

श्रीवर्धन-जीवना, दांडा बंदरात नौका किनाऱ्यावर; मच्छिमारांची लगबग वाढली
श्रीवर्धन (संदेश घोलप) अरबी समुद्रातील यंदाचा मच्छिमारी हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून, १ जूनपासून लागू होणाऱ्या पावसाळी मासेमारी बंदीच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन आणि जीवना व दांडा बंदर परिसरात मच्छिमारांची मोठी लगबग सुरू झाली आहे. मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच मच्छिमारांनी आपल्या नौका समुद्रातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी लावण्यास सुरुवात केली आहे.
यंदाचा हंगाम मच्छिमारांसाठी अपेक्षेप्रमाणे लाभदायक ठरला नसल्याची भावना स्थानिक मच्छिमारांनी व्यक्त केली. समुद्रात पापलेट, हलवा आणि घोळ यांसारख्या महागड्या मासळीचे प्रमाण कमी झाल्याने अनेक नौकांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यातच डिझेल दरवाढीमुळे मासेमारीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने आर्थिक ताण अधिकच वाढला.
सध्या श्रीवर्धनमधील जीवना व दांडा बंदर परिसरात नौकांच्या दुरुस्तीची आणि सुरक्षिततेची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. नौका किनाऱ्यावर लावल्यानंतर त्यांच्या रंगरंगोटीपासून इंजिन दुरुस्तीपर्यंत विविध कामे केली जात आहेत. तसेच मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्यांची विणकामे आणि दुरुस्तीही पावसाळ्यात केली जाणार आहे.
वादळी वाऱ्यांचा धोका लक्षात घेऊन नौका खाडीत किंवा सुरक्षित स्थळी ‘लंगर’ टाकून बांधल्या जात आहेत. अनेक नौकांवर काम करणारे परराज्यातील खलाशीही आता आपल्या गावी परतण्याच्या तयारीत असल्याचे चित्र बंदरावर दिसत आहे.
हंगाम संपण्यास काहीच दिवस शिल्लक असताना खोल समुद्रात गेलेल्या काही नौकांकडून शेवटच्या टप्प्यात चांगली मासळी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेवटच्या काही दिवसांत ‘बंपर’ मासळी मिळाल्यास यंदाच्या तोट्याची काही प्रमाणात भरपाई होईल, अशी आशा मच्छिमार बांधवांनी व्यक्त केली.
मान्सूनपूर्व हवामानातील बदल आणि संभाव्य वादळांचा धोका लक्षात घेता मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छिमारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या नियमानुसार १ जूनपासून समुद्रात मासेमारीस बंदी लागू होणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


