आष्टीत मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेच्या कामांचा आढावा

आष्टीत मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेच्या कामांचा आढावा
प्रलंबित रस्ते तातडीने पूर्ण करा;दर्जेदार कामांना प्राधान्य
—-आ. सुरेश धस
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तहसील कार्यालय येथे मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेअंतर्गत आष्टी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित व अत्यावश्यक रस्ते कामांचा सविस्तर आढावा बैठक आमदार सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आष्टी, पाटोदा व शिरूर (का.) तालुक्यातील गाव व वस्ती जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची कामे अनेक वर्षांपासून अपूर्ण असल्याने शेतकरी व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब बैठकीत समोर आली.
विशेषतः शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी आवश्यक असलेल्या पाणंद रस्त्यांची दयनीय अवस्था गंभीर असून ही कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आ. सुरेश धस यांनी संबंधित विभागांना दिल्या. ज्या रस्त्यांवर अतिक्रमणे झाली आहेत ती तात्काळ हटवून रस्त्यांची हद्द निश्चित करावी, प्रलंबित मोजणी प्रक्रिया पूर्ण करावी तसेच दर्जेदार व नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
भूमी अभिलेख, महसूल, पंचायत समिती तसेच तांत्रिक विभागांनी समन्वय साधून शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने कामे तातडीने पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देशही आ. धस यांनी दिले.
बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीमती वसीमा शेख, तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील, तहसीलदार श्री घोळवे, नायब तहसीलदार जोशी, उपाधीक्षक भूमी अभिलेख मोरे, तालुका कृषी अधिकारी तरटे, महसूल मंडळ अधिकारी, तलाठी, सर्वेअर तसेच पंचायत विभागाचे तांत्रिक अधिकारी व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.
चौकट
आ.सुरेश धस यांनी घेतला जलसंधारण कामांचा आढावा
आष्टी येथे मृदा व जलसंधारण, जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या विविध कामांची आढावा बैठक पार पडली.२०२५ मधील अतिवृष्टीमुळे साठवण तलाव, पाझर तलाव व बंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने दुरुस्ती व खोलीकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.सामाजिक दायित्व निधी व लोकसहभागातून कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने जूनपूर्वी पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.यावेळी बैठकीस उपअभियंता उदमले, विशाल हात्ते, पाटील, पालवणकर,प्रफुल्ल राख,नाम फाउंडेशनचे राजाभाऊ शेळके, सिनारे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.



