बीड
राष्ट्रवादी काँग्रेसची श्रीवर्धनमध्ये वज्रमूठ; संघटनात्मक बांधणीसाठी कार्यकर्त्यांचा निर्धार

राष्ट्रवादी काँग्रेसची श्रीवर्धनमध्ये वज्रमूठ; संघटनात्मक बांधणीसाठी कार्यकर्त्यांचा निर्धार
श्रीवर्धन (संदेश घोलप):
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत आणि व्यापक करण्याच्या उद्देशाने श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. तालुकाध्यक्ष श्री. मंदार तोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी या वेळी सखोल चर्चा करण्यात आली.
या वेळी मार्गदर्शन करताना नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष मंदार तोडणकर यांनी सांगितले की, “तालुक्यात पक्षाची मुळे अधिक घट्ट करण्यासाठी सक्षम आणि कार्यक्षम नावांची शिफारस वरिष्ठ पातळीवर करण्यात आली आहे. खासदार श्री. सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच नवीन कार्यकारणी जाहीर होईल आणि ही टीम नव्या जोमाने कामाला सुरुवात करेल.”
पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने मैदानात उतरावे, असे आवाहन तोडणकर यांनी या वेळी केले.
या बैठकीला मतदारसंघाचे अध्यक्ष श्री. उदय बापट, श्रीवर्धन पंचायत समिती सभापती श्री. सचिन किर, कार्याध्यक्ष संदेश काते, महिला अध्यक्षा सबा फिरफिरे, श्री. मोहम्मद भाई, श्री. मंगेश कोमनाक यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी काळात श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची लाट अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक गावोगावी जाऊन जनसंपर्क वाढवण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.



