📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

छाया पांचाळ मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई करा; अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना घेराव – किस्किंदा पांचाळ यांचा निर्वाणीचा इशारा

छाया पांचाळ मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई करा; अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना घेराव – किस्किंदा पांचाळ यांचा निर्वाणीचा इशारा

*बीड, दि. १७ :* बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या छाया गणेश पांचाळ यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा येत्या सात दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी यांना मोठ्या संख्येने घेराव घालण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा किस्किंदा पांचाळ यांनी दिला आहे.

छाया पांचाळ यांचा मृत्यू हा जिल्हा रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला असून गेल्या वर्षभरापासून न्यायासाठी विविध स्तरांवर संघर्ष सुरू आहे. या प्रकरणी आरोग्य परिमंडळ लातूर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या चौकशी समित्यांनी तपास करून संबंधितांच्या कार्यपद्धतीवर गंभीर ताशेरे ओढल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

या चौकशी अहवालाच्या आधारे संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच दोषींना  अभय देणाऱ्या तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांच्यावरही प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, दिनांक १२ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या दालनात या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस बीड शहर स्टेशनचे पोलीस पोलीस निरीक्षक घोळवे, तपास अधिकारी महेश जाधव, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश सोळंके, किस्किंदा पांचाळ, बाळासाहेब मोरे, आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सय्यद सादिक, आणि सामाजिक कार्यकर्ते भीमराव कुटे उपस्थित होते.

बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून याबाबत पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याची विनंती केली होती. तसेच आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही करण्यात आले होते. मात्र संबंधित पत्रव्यवहार कोणत्या अधिकाऱ्यांशी सुरू आहे. याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

त्यानंतर १५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मध्यस्थीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पत्र प्राप्त झाल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

मात्र सात दिवसांच्या आत वरिष्ठ स्तरावरील अहवाल प्राप्त करून दोषींवर कारवाई करण्यात आली नाही तर मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पीडित कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी यांना  घेराव घालण्यात येईल, असा इशारा किस्किंदा पांचाळ यांनी दिला आहे.

विशेष म्हणजे छाया पांचाळ मृत्यूप्रकरणी आतापर्यंत आक्रोश आंदोलन, शोले स्टाईल आंदोलन, ठिय्या आंदोलन, लाक्षणिक आंदोलन अशा तब्बल आठ विविध आंदोलनांसह ७० ते ८० निवेदने प्रशासनाला देण्यात आली आहेत. तरीदेखील अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या प्रकरणी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.

तसेच भविष्यात आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास जिल्हा प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय तसेच संबंधित पोलीस यंत्रणा जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Back to top button