बीड
श्रीवर्धनमध्ये स्मार्ट मीटरविरोधात संतापाची लाट! तात्काळ स्थगिती द्या, अन्यथा उग्र आंदोलन पेटणार! राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळकृष्ण चाचले यांचा महावितरणला थेट इशारा; नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण.

श्रीवर्धनमध्ये स्मार्ट मीटरविरोधात संतापाची लाट! तात्काळ स्थगिती द्या, अन्यथा उग्र आंदोलन पेटणार!
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळकृष्ण चाचले यांचा महावितरणला थेट इशारा; नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण.
श्रीवर्धन (संदेश घोलप):
श्रीवर्धन शहरात सध्या महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या मोहिमेला आता तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. “नागरिकांच्या मनातील शंकांचे निरसन न करताच जर महावितरणने ही सक्ती सुरू ठेवली, तर शहरवासीयांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा थेट आणि आक्रमक इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीवर्धन शहराध्यक्ष बाळकृष्ण पांडुरंग चाचले यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे. या संदर्भातील एक मागणीचे पत्र त्यांनी महावितरणच्या श्रीवर्धन शाखेला सादर केले आहे.
काय आहे नेमका वाद?
महावितरणने श्रीवर्धन शहरात जुने वीज मीटर काढून त्या जागी नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसविण्याचा धडाका लावला आहे. मात्र, या नवीन मीटरच्या कार्यपद्धतीबाबत, संभाव्य वाढीव बिलांबाबत आणि रिचार्ज पद्धतीबाबत जनतेमध्ये प्रचंड संभ्रम आणि भीतीचे वातावरण आहे.
”शासनाने किंवा महावितरणने स्मार्ट मीटरबाबत कोणतीही अधिकृत जनजागृती केलेली नाही. नागरिकांना अंधारात ठेवून ही घाईघाईने मीटर बदलण्याची प्रक्रिया का राबवली जात आहे?” असा संतप्त सवाल बाळकृष्ण चाचले यांनी आपल्या पत्रातून उपस्थित केला आहे.
पत्रातील प्रमुख मागण्या आणि महावितरणला अल्टिमेटम:
कामावर तात्काळ स्थगिती: जोपर्यंत नागरिकांच्या मनातील सर्व शंकांचे पूर्णपणे निरसन होत नाही, तोपर्यंत स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तातडीने थांबवावे.
पारदर्शकता हवी: स्मार्ट मीटरचे नेमके फायदे-तोटे काय? बिलिंग कसे होणार? याची संपूर्ण आणि पारदर्शक माहिती प्रशासनाने जाहीर करावी.
सक्ती थांबवा: जुने मीटर काढण्यासाठी ग्राहकांवर कोणतीही सक्ती किंवा घाई करण्यात येऊ नये.
.तर श्रीवर्धनकर रस्त्यावर उतरणार!
महावितरण प्रशासनाने या पत्राची दखल घेऊन सकारात्मक निर्णय न घेतल्यास, श्रीवर्धन शहरातील सर्व आजी-माजी नगरसेवक, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि संतप्त नागरिकांना सोबत घेऊन महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा व उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा बाळकृष्ण चाचले यांनी दिला आहे.
आता या वाढत्या जनक्षोभावर महावितरण प्रशासन काय पाऊल उचलते आणि नागरिकांचा संभ्रम दूर करण्यासाठी पुढे येते का? याकडे संपूर्ण श्रीवर्धन तालुक्याचे लक्ष लागले आहे.


