बीड

भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी – महंत डॉ. नामदेव शास्त्री

भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी – महंत डॉ. नामदेव शास्त्री
बीड प्रकरणात राजकीय लोकांनी सामाजिक सलोखा बिघडवला – नामदेव शास्त्री यांनी केली ‘त्या’ पुढाऱ्यांची कानउघाडणी
गडाच्या आशीर्वादाने आत्मविश्वास आणि लढण्याचे बळ मिळाले, अधिक जोमाने काम करत राहणार – धनंजय मुंडे
पाथर्डी/भगवानगड – धनंजय हा जनतेचा सेवक म्हणून काम करणारा तरुण आहे. दोन पिढ्यांपासून मुंडे कुटुंबीय भगवानगडाचे निस्सीम भक्त आहेत. मुंडेंचे राजकीय व सामाजिक आयुष्य, त्यांनी आजवर केलेले काम पाहिल्यास लक्षात येते की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांना संघर्ष आणि आरोप – प्रत्यारोपांना सामोरे जावे लागले आहे. आज भगवानगडावर दर्शनाला आला तेव्हा सुध्दा त्याच्या हाताला सलाईन लावलेले आहेत. धनंजयचा बीड हत्या प्रकरणात कसलाही संबंध नाही हे स्पष्ट आहे. कुणाकडे खंडणी मागून जगणारा तो माणूस नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. या प्रकरणात गुन्हेगार असलेल्या आरोपींचे कुणीही समर्थन करू शकत नाही, मात्र याआडून धनंजयला जाणीवपूर्वक बदनाम करून अडचणीत आणले जात आहे, या परिस्थितीत भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभा आहे, असे प्रतिपादन गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी केले आहे.
मंत्री धनंजय मुंडे हे गुरुवारी रात्री भगवानगड येथे दर्शनासाठी मुक्कामी आले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांनी पुन्हा गडावर संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन विधिवत पूजन केले.
दरम्यान महंत डॉ नामदेव शास्त्री यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. बीड जिल्ह्यात घडलेले हत्याकांड हे अत्यंत दुर्दैवी होते, ते कोणत्या कारणांनी घडले हे तपासले गेले पाहिजे. मात्र त्या घटनेच्या आडून सामाजिक सुरक्षेची जबाबदारी असलेल्या लोकप्रतिनिधी आणि माध्यमांनी या प्रकरणात मीडिया ट्रायल करून धनंजय मुंडेना आरोपी म्हणून नाहक बदनाम करत एक वेगळीच प्रतिमा निर्माण केली. त्याचबरोबर राजकीय लोकांनी त्यांचे राजकीय व वैयक्तिक विषय डोळ्यासमोर ठेऊन या प्रकरणाच्या आडून सामाजिक सलोखा बिघडवला असे मत व्यक्त करत महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी संबंधित पुढाऱ्यांची कानउघडणी केली आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी गडाचा निरोप घेण्याआधी आज सकाळी पुन्हा एकदा ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांच्या समाधीचे तसेच महंत गुरुवर्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांचे दर्शन व आशीर्वाद घेतले.
मी भगवानगडाचा एक निस्सीम भक्त आहे. भगवानगड, येथील ऐश्वर्य हे अठरा पगड जातीतील कष्टकरी वर्गाच्या एक एक रुपयाने निर्माण झालेले आहे. इथे संत ज्ञानेश्वर महाराजांचे, संत भगवानबाबा यांचे विचार शिकवले जातात. हे विचार मला राजकीय व सामाजिक आयुष्यात काम करताना प्रेरणा व ऊर्जा देण्याचे काम करतात. आज महंत डॉ नामदेव शास्त्री महाराज यांच्या सान्निध्यात गडाच्या आशीर्वादाने एक नवी ऊर्जा, शक्ती आणि बळ घेऊन जात आहे, आशीर्वादाची ही शिदोरी व गडाचा पाठिंबा माझ्यासाठी खूप अनमोल आणि तितकीच जबाबदारीची जाणिव करुन देणारा आहे. महंतांनी आणि गडाने माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास माझ्यात अधिक आत्मविश्वास वाढवणारा असून यापुढे सामान्य लोकांसाठी अधिक जोमाने काम करत राहणार आहे, असे मत यावेळी धनंजय मुंडे यांनी बोलताना व्यक्त केले.
Back to top button