कोरियन बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.ली.ची.रान यांची तुलसी महाविद्यालयास सदिच्छा भेट

बीड (दि.३१) – दक्षिण कोरिया येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. ली ची रान आणि सिओल येथील बुल्गवांगडाँग जिओल बौद्ध विहाराचे मुख्य मठाधिपती भिक्खू थेर यिम.चांग.वू. यांनी काल दि.३० रोजी दुपारी १२.३० वा. देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली.यावेळी बीड येथील प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्थेचे सचिव पु.भिक्खू धम्मशील थेरो, तुलसी शैक्षणिक समूहाचे संचालक प्रा. प्रदीप रोडे, ग्रोथ स्ट्रॅटेजिस्ट मा.नितीन साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.ली ची रान शिष्टमंडळाचे महाविद्यालयात आगमन झाले असता, प्राचार्य प्रा.डी.जी.निकाळजे यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची माहिती घेतली. तसेच महाविद्यालयातील विविध विभागांची पाहणी करून तेथील शैक्षणिक सुविधांची माहिती घेतली आणि भरभरून कौतुक केले.
यावेळी डॉ.रान यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना उच्च शिक्षण आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण आणि नोकरीच्या उपलब्ध संधीबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नितीन साळवे यांनी विद्यार्थ्यांना बोलतांना सौजन्य, मैत्री आणि ज्ञान हे तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनच आणि मायभूमीच सोन कराल,अशी भावना व्यक्त केली.प्रा.प्रदीप रोडे यांनी डॉ. रान यांच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आणि या भेटीमुळे दोन्ही देशामधील शैक्षणिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील,असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अंकुश कोरडे तर आभार प्रा. किशोर वाघमारे यांनी मानले. यावेळी इंजि. दिपंकर रोडे, सामाजिक कार्यकर्ते श्री भास्कर सरपते यांचेसह तुलसी शैक्षणिक समूहातील प्राद्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



