बीड

अंबाजोगाईत पोलिसांची धडक कारवाई; पावणेआठ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त

अंबाजोगाईत पोलिसांची धडक कारवाई; पावणेआठ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त
अंबाजोगाई, प्रतिनिधी दि. ५ : अंबाजोगाई शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या धडक कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ३ लाख ४० हजार २० रुपये किमतीचा प्रतिबंधित माल तसेच वाहतुकीसाठी वापरले जाणारे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ७ लाख ९० हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी मोरेवाडी परिसरातील शिक्षक कॉलनी येथील रहिवासी शशिकांत शिवाजी बुलबुले (वय २५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी वेस परिसरातून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती अंबाजोगाई शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पंचांसमक्ष सापळा रचून संशयित एमएच-४४-बी-२५२९ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून विमल पान मसाला, विडी-१ तंबाखू, प्रीमियम गोवा १००० मसाला, प्रीमियम राज निवास सुगंधी पान मसाला, प्रीमियम झेडएल-०१ जाफरानी जर्दा, डॉक्टर स्पेशल पान मसाला तसेच प्रीमियम शॉर्ट लक्झरी सेव्हन टोबॅको पान मसाला आदी विविध प्रकारचा प्रतिबंधित माल आढळून आला.
पोलिसांनी तत्काळ संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाणे करीत आहेत.
ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे तसेच अंबाजोगाईचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाणे, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस हवालदार नागरगोजे, पोलीस नाईक तेजस वावळे, पोलीस अंमलदार राठोड, पोलीस शिपाई हनुमंत चादर आणि सुशांत गायकवाड यांनी सहभाग घेतला.
या कारवाईमुळे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापारावर पोलिसांनी पुन्हा एकदा वचक निर्माण केला आहे.
Back to top button