बीड

बीड तालुक्यात एनडीआरएफ पथकामार्फत बिंदुसरा तलावात प्रशिक्षण व जनजागृती

बीड तालुक्यात एनडीआरएफ पथकामार्फत बिंदुसरा तलावात प्रशिक्षण व जनजागृती
         तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार बीड तालुक्यातील पाली जवळील बिंदुसरा तलावात एनडीआरएफ च्या 16 जणांच्या पथकामार्फत शुक्रवार  दि 31 जानेवारी रोजी शालेय विद्यार्थी , नागरिक यांना नैसर्गिक आपत्तीत कशाप्रकारे स्वतःचा बचाव करावा , इतरांस सहाय्य करावे याबाबत  प्रशिक्षण देण्यात आले . यावेळी विविध शासकीय अधिकारी , कर्मचारी , पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
           किशोर जाधव यांच्या नेतृत्वाखाली राजू प्रसाद , गवळी संतोष  ,  संतोष शिंदे ,  दानवे अनिल ,  पाटील अनिल ,  मोरे किशोर राम  , पवार विशाल  , खवारे किरण , जायभाय शिवम  ,  नीता कुंडेकर , बागुल विनेश  ,  मोरे अमोल , गायकवाड सुनील  , सय्यद मुनीर ,  भालेराव गणेश या एनडीआरएफ टीम मधील अधिकारी व कर्मचारी यांनी मौजे पाली येथील बिंदुसरा डॅम येथे प्रात्यक्षिक करून दिले .
       राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या पुढाकारातून जिल्हाभर नागरिकांना , विद्यार्थ्यांना शासकीय अधिकारी , कर्मचाऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचे वेळी कशाप्रकारे आपत्तीग्रस्तांना मदत करावी स्वतःच्या जीवाची काळजी घेत इतरांना कशी मदत करावी याबाबतचे प्रशिक्षण देण्याची योजना विचाराधीन होती  .
          निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्ह्यातील बिंदुसरासारखी धरणे तलाव याची माहिती घेतली . त्यानुसार एनडीआरएफची टीम सर्वत्र जाऊन जनतेला व शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम राबवित आहे  . बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या माध्यमातून बीड , गेवराई व शिरूर तालुक्यात अशी प्रशिक्षणे आयोजित करण्यात आलेली आहेत .
          पावसाळ्यात अनेक ठिकाणी धो धो पाऊस बरसतो . यामुळं संपूर्ण जनजीवन विस्कळीत होत . अशा वेळी पूरस्थितीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रथम धावून येतं ते एन डी आर एफ च पथक . भूकंप , महापूर , त्सुनामी , चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीवेळी एन डी आर एफ दलाला पाचारण केलं जात . एन डी आर एफ  ( नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स ) म्हणजेचं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल .
एन डी आर एफ म्हणजे काय ?
           अनेकदा  पूरस्थितीत , भूकंप किंवा चक्रीवादळ अशा स्थितीत नागरिकांच्या मदतीला  एन डी आर एफ  चे जवान येतात . या दलाचे जवान पूर किंवा आपत्तीने ग्रस्त असलेल्या ठिकाणच्या नागरिकांचे प्राण वाचवतात . तुम्हाला प्रश्न पडला असेल की एन डी आर एफ म्हणजे नेमकं काय ? एन डी आर एफचे पूर्ण नाव हे  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आहे . एनडीआरएफ ही एक अशी शक्ती आहे की , जी नैसर्गिक आपत्ती असताना काम करते . यासाठी भूकंप , पूर यासारख्या परिस्थितीत , एनडीआरएफ फोर्सची एक टीम तयार केली जाते . संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी या टीमला पाठवलं जात . यात तीन बीएसएफ , दोन सीआरपीएफ , दोन सीआयएसएफ , दोन आयटीबीपी आणि दोन एसएसबी जवानांचा समावेश असतो .
         जिथे जिथे कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती येते तिथे ही टीम अडकलेल्या लोकांसाठी मदत कार्य करते . एन डी आर एफ  हे 12 बटालियनचे एक दल आहे .
          दरवर्षी मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पूर येतो .  यावेळी एन डी आर एफ  कामाला येते . यात तीन सीमा सुरक्षा दल , तीन केंद्रीय राखीव पोलीस दल , दोन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल , दोन इंडो-तिबेट सीमा पोलीस , दोन सशस्त्र सीमा बल आणि एक आसाम रायफल्स . प्रत्येक बटालियनची एकूण संख्या अंदाजे 1 हजार 149 आहे . प्रत्येक बटालियनमध्ये इंजिनीअर , तंत्रज्ञ , इलेक्ट्रिशियन , श्वान पथक आणि वैद्यकीय / पॅरामेडिक्ससह असे प्रत्येकी 47 जवान असतात .
कधी झाली एन डी आर एफ  फोर्सची स्थापना ?
             आपत्ती व्यवस्थापन कायदा , 2005 अंतर्गत धोकादायक आपत्ती परिस्थितीला विशेष प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने 2006 मध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना करण्यात आली . एन डी आर एफ  हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आखत्यारित येते . एनडीआरएफ फोर्स ही 16 बटालियनची एक फौज आहे . जी पॅरा-मिलिटरी लाइनवर आधारीत आहे . भारताच्या निमलष्करी दलांकडून प्रतिनियुक्तीवर व्यक्तींनी तयार केली जाते . एन डी आर एफ  चे घोषवाक्य हे  ‘आपदा सेवा सदैव’ असे आहे . या घोषवाक्याचा अर्थ आपत्तीच्या वेळी सदैव सेवा हीच प्राथमिकता असा होतो . पियुष आनंद हे देशपातळीवर महासंचालक आहेत .  संतोष बहादूरसिंग हे महाराष्ट्र एन डी आर एफचे  ( कमांडंट ) प्रमुख  आहेत .
         महाराष्ट्र आणि गोवा ही राज्य पाचव्या बटालियनच्या कार्यक्षेत्रात येतात . यामध्ये एकूण 18 तुकड्या आहेत . यापैकी मुंबईत 3 , पुण्यात 14 तर नागपूरमध्ये 1 तुकडी आहे .
एन डी आर एफ  मध्ये कसे जावे ?
              एनडीआरएफमध्ये दाखल होण्यासाठी  बीएसएफ ,  सीआरपीएफ  , सिआयएसएफ  , आयटीबीपी आणि एसएसबी यांसारख्या पॅरामिलिटरीचे जवान असणे आवश्यक आहे .  कारण प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून जवानांची नियुक्ती केली जाते . प्रतिनियुक्तीचा कालावधी सात ते नऊ वर्षं इतका असू शकतो . जवानांना 19 आठवड्यांचे आंतरराष्ट्रीय स्तराचं प्रशिक्षण दिलं जातं .
एन डी आर एफ : प्रशिक्षण
       आपत्ती व्यवस्थापनाच्या मूलभूत गोष्टींमध्ये आधी राज्य पोलीस कर्मचार्‍यांना प्रशिक्षित केले जाते . दुसरे म्हणजे , राज्य आपत्ती प्रतिसाद म्हणून त्यांच्या राज्य सशस्त्र पोलीस तुकड्यांमधून किमान एका बटालियनला प्रशिक्षित केले जाते . तसेच एन डी आर एफ  च्या धर्तीवर फोर्स एन डी आर एफ  दल कार्यरत असते .  पोलिस कर्मचार्‍यांव्यतिरिक्त , अग्निशमन सेवा , गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण यांच्या विद्यमान संसाधनांमधून एन डी आर एफची स्थापना केली जाते .
       देशात 13 ठिकाणी ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या बटालियनच्या टीम पुढीलप्रमाणे आहेत .
1) बीएन एनडीआरएफ , गुवाहाटी , आसाम – बीएसएफ
2) बीएन एनडीआरएफ , नदिया, पश्चिम बंगाल – बीएसएफ
3) बीएन एनडीआरएफ , कटक ओडिशा – सीआईएसएफ
4) बीएन एनडीआरएफ , वेल्लोर , तामिळनाडू- सीआईएसएफ
5) बीएन एनडीआरएफ , पुणे , महाराष्ट्र – सीआरपीएफ
6) बीएन एनडीआरएफ , वडोदरा , गुजरात – सीआरपीएफ
7) बीएन एनडीआरएफ , गाजियाबाद , उत्तर प्रदेश – आईटीबीपी
8) बीएन एनडीआरएफ , भटिंडा, पंजाब – आईटीबीपी
9) बीएन एनडीआरएफ , पटना, बिहार – बीएसएफ
10) बीएन एनडीआरएफ , गुंटूर , आंध्र प्रदेश – सीआरपीएफ
11) बीएन एनडीआरएफ , वाराणसी, उत्तर प्रदेश – एसएसबी
12) बीएन एनडीआरएफ , ईटानगर , अरुणाचल प्रदेश – एसएसबी
13) बीएन एनडीआरएफ , जम्मू आणि काश्मिर – आसाम रायफल
              मागच्या काही वर्षातील एनडीआरएफच्या प्रमुख कारवाया ( ऑपरेशन ) पुढीलप्रमाणे आहेत .
        2015 मध्ये एप्रिल महिन्यात नेपाळ आणि भारताच्या काही भागात भूंकप झाला होता . त्यावेळी एनडीआरएफच्या टीम भारत आणि नेपाळच्या काही भागांमध्ये गेल्या होत्या .  नोव्हेंबर 2015 मध्ये चेन्नई आणि तामिळनाडूमध्ये काही भागात पूर आला होता . त्यावेळी तेथील हजारो नागरिकांना वाचवण्याचे काम एन डी आर एफ च्या जवानांनी केलं होते .
       केरळमध्ये ऑगस्ट 2018 मध्ये आलेल्या पुराच्या वेळी एन डी आर एफ च्या  58 तुकड्यांची नियुक्ती करण्यात आली होती .  एका राज्यात एन डी आर एफ ची उभारणी झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक तैनाती होती . यावेळी 194 लोकांचा जीव वाचवण्यात एन डी आर एफ ला यश मिळालं होत . दहा हजारहून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले होते .
            2020 साली आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे गॅस गळतीची घटना घडली होती . 7 मे 2020 ला ही घटना घडली होती . यावेळी देखील एन डी आर एफ ची भूमिका महत्वाची होती . याच वर्षी पश्चिम बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळ आले होते . या वादळातून देखील हजारो लोकांना वाचवण्याचे काम एन डी आर एफ च्या जवानांनी केलं आहे .
      2021 साली उत्तराखंडमध्ये हिमनद्यांचा उद्रेक झाला होता . त्यावेळी तिथे पूर आला होता . ही घटना 7 फेब्रुवारी 2021 मध्ये घडली होती . यावेळी एन डी आर एफ च्या जवानांनी हजारो लोकांना बाहेर काढले होते .  तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळ आलं होतं . यावेळी देखील एन डी आर एफ च्या जवानांनी मोलाची कामगिरी बजावली .
               बिंदुसरा जलाशयात शुक्रवारी एनडीआरएफच्या पथकाने विविध प्रात्यक्षिके करून दाखविली . शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . यावेळी  शितल चाटे  मंडळ अधिकारी विभाग पाली , अनिल  गायकवाड ग्राम महसूल अधिकारी पाली , जितेंद्र शेळके ग्राम महसूल अधिकारी आहेरवडगाव , संदीप  नवले सरपंच पाली ,  मनीषा  मुंडे शिक्षिका जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाली , अंबादास गुजर सरपंच मंजरी हवेली , आनंद मस्के ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी , योगेश निर्धार  पोलीस कर्मचारी हे उपस्थित होते .
         कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन सज्ज आहे . अशा वेळी नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे .
.
Back to top button