सोनदरा गुरुकुलचा निवासी व्यक्तिमत्व विकास शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोनदरा गुरुकुलचा निवासी व्यक्तिमत्व विकास शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
दहा दिवसांच्या आनंद वर्गातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
जामखेड प्रतिनिधी: पाटोदा तालुक्यातील डोमरी येथील सोनदरा गुरुकुल व सूर्या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले दहा दिवसीय निवासी आनंद वर्ग व्यक्तिमत्व विकास शिबिर दि. १ मे ते ११ मे दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या शिबिरात महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमधून सुमारे ५० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सोनदरा गुरुकुलचे अध्यक्ष अनिल लोखंडे, सचिव आश्विन भोंडवे, सूर्या फाउंडेशनचे प्रोजेक्ट हेड गौतम नायक, शिबिर प्रमुख संदिप मौर्य, शिबिर समन्वयक निता चव्हाण व योगेश गरड तसेच पालक प्रतिनिधी संतोष नवलाखा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी मान्यवर, पालक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
दहा दिवसांच्या या निवासी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला. सकाळ, दुपार व सायंकाळ अशा विविध सत्रांमध्ये नेतृत्व विकास, संवाद कौशल्य, समूहामध्ये कार्य करण्याची क्षमता, शिस्त, वेळेचे नियोजन यांसारख्या जीवनावश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच छंद वर्गांच्या माध्यमातून पोहणे, नृत्य, चित्रकला, कलाकारी, कवायत-व्यायाम, विविध मैदानी खेळ आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नवीन गोष्टी आत्मसात केल्या.
शिबिराच्या समारोप प्रसंगी विविध उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यानंतर सर्व विद्यार्थी, पालक व मान्यवरांनी एकत्रित नाश्ता व भोजनाचा आनंद घेतला.
खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या आनंद वर्ग शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त व सामाजिक जाणीव निर्माण झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सोनदरा गुरुकुल, डोमरी व सूर्या फाउंडेशन दिल्लीच्या शिक्षक, शिक्षिका, सेवक, कार्यकर्ते व गटप्रमुख यांनी मोलाचे सहकार्य केले. समारोप कार्यक्रमास पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



