बीड
निष्ठावंत अनिलदादा जगताप यांना विधान परिषदेत संधी द्या- सुनिल सुरवसे

निष्ठावंत अनिलदादा जगताप यांना विधान परिषदेत संधी द्या- सुनिल सुरवसे
================
बीड, प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते सन्मानीय ना. एकनाथजी शिंदे साहेब आणि संसदरत्न खा. डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी येणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातील किमान एक जागा बीड जिल्ह्यासाठी राखीव ठेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांना विधान परिषद या जागेसाठी संधी द्यावी, अशी ठाम मागणी शिवसेना जिल्हा संघटक सुनिल सुरवसे यांनी केली आहे. तसेच या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जिल्ह्यातील शिवसैनिकांना न्याय द्यावा आणि संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने मदत करावी. असे आवाहनही त्यांनी केले आहे. अनिलदादा जगताप यांनी १९८६ पासून शिवसेनेत कार्य करत तब्बल चार दशकांहून अधिक काळ पक्षाशी निष्ठा ठेवली आहे. शिवसैनिक, शाखाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख ते जिल्हाप्रमुख असा त्यांचा प्रवास असून नगरसेवक, जिल्हा परिषद आणि विधानसभा अशा विविध निवडणुकाही त्यांनी पक्षाच्या चिन्हावर लढवल्या आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवसेना हाच त्यांचा परिवार राहिला असून त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि निष्ठावान कार्याचा विचार करता त्यांना विधान परिषदेत संधी देणे योग्य ठरेल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, एकेकाळी बीड जिल्ह्यातील सातपैकी चार मतदारसंघांवर शिवसेनेचे वर्चस्व होते. माजलगाव, बीड आणि गेवराईसारख्या मतदारसंघांतून शिवसेनेचे आमदार निवडून येत होते. मात्र बदलत्या राजकीय समीकरणांमुळे हळूहळू हे सर्व मतदारसंघ पक्षाच्या हातातून निसटले. अखेरीस बीड विधानसभा हा एकमेव मतदारसंघ उरला होता, पण २०२४ च्या निवडणुकीत तोही महायुती धर्मपालनेत इतर पक्षाकडे गेल्याने जिल्ह्यातील शिवसैनिक पूर्णपणे निराश झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात शिवसेनेचा एकही लोकप्रतिनिधी नसल्याने कार्यकर्त्यांना विविध शासकीय कामांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पोलीस स्टेशन, तहसील, रुग्णालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील कामांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवत असून मित्रपक्षांकडूनही अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची भावना कार्यकर्त्यांत आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याला एक सक्षम, संवेदनशील आणि हक्काचा लोकप्रतिनिधी मिळणे अत्यावश्यक झाले असून अनिलदादा जगताप यांना विधान परिषदेत संधी दिल्यास संघटना अधिक मजबूत होईल आणि शिवसैनिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास सुनिल सुरवसे यांनी बीड जिल्ह्याच्या तमाम शिवसैनिकांच्या वतीने व्यक्त केला आहे. याबरोबरच सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कष्टाचा सन्मान करणारे शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि खा. डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब हे या मागणीचा सकारात्मक विचार करून बीड जिल्ह्याला न्याय देतील, अशी अपेक्षा शिवसेना बीड जिल्हा संघटक सुनिल सुरवसे यांनी व्यक्त केली आहे.



