बीड

माता-बाल संगोपनात बीड राज्यात अव्वल; मात्र २१ कोटींची माता व बाल संगोपन इमारत अडीच वर्षांपासून धुळखात पडुन 

माता-बाल संगोपनात बीड राज्यात अव्वल; मात्र २१ कोटींची माता व बाल संगोपन इमारत अडीच वर्षांपासून धुळखात पडुन
पालकमंत्री सुनेत्राताईंनी दिवंगत अजितदादांचे स्वप्न पूर्ण करावे – डॉ. गणेश ढवळे
बीड (दि.१२) : कुटुंब कल्याण, बालसंगोपन आणि लसीकरण यांसारख्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीत बीड जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावत आरोग्य विभागाच्या मूल्यमापनात ९३ गुण मिळवले आहेत. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड सुनेत्रा पवार यांच्या हस्ते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांचा याबद्दल सन्मान करण्यात आला.
मात्र दुसरीकडे, महिला व बालकांसाठी स्वतंत्र आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तब्बल २१ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली १०० खाटांची माता व बाल संगोपन इमारत गेल्या अडीच वर्षांपासून निधीअभावी धुळखात पडून असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
फर्निचर, लिफ्ट, फायर फायटिंग, विद्युतीकरण, ऑक्सिजन पाइपलाइन आदी कामांसाठी निधी उपलब्ध नसल्याने ही अत्याधुनिक इमारत अद्याप कार्यान्वित होऊ शकलेली नाही. त्यामुळे केवळ पुरस्कार देऊन सन्मान न करता पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना दिलेल्या लेखी निवेदनातून केली आहे.
महिला रुग्णांची गैरसोय वाढली
जिल्हा रुग्णालयाची खाट क्षमता ३२० असताना प्रत्यक्षात दररोज सुमारे ४०० हून अधिक रुग्ण दाखल असतात. विशेषतः प्रसुती व प्रसुतीपश्चात विभागात क्षमतेपेक्षा अधिक महिलांना उपचार घ्यावे लागत असल्याने मोठी गैरसोय निर्माण होत आहे.
सोनोग्राफी विभागालाही अपुरी जागा असल्याने गर्भवती महिला व नवमातांची हेळसांड होत आहे. माता व बाल संगोपन इमारत कार्यान्वित झाल्यास तपासण्या, सोनोग्राफी, प्रसुती व उपचार स्वतंत्र १०० खाटांच्या रुग्णालयात होऊन महिला व बालकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
“अजितदादांचे स्वप्न सुनेत्राताईंनी पूर्ण करावे”
दिवंगत उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन पालकमंत्री अजितदादा पवार यांनी या माता व बाल संगोपन रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून ऑक्सिजन पाइपलाइन, शस्त्रक्रियागृह व लिफ्टची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व सार्वजनिक विद्युत विभागाच्या हलगर्जीमुळे ही कामे अद्याप रखडलेली आहेत.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी स्वतः लक्ष घालून रखडलेली कामे पूर्ण करावीत, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.
“लवकरच इमारत कार्यान्वित करू” – डॉ. सतीशकुमार साळुंके
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार साळुंके यांनी सांगितले की, माता व बाल संगोपन इमारतीतील उर्वरित सुविधा पूर्ण करून ती कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाचा पाठपुरावा सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सार्वजनिक बांधकाम विभाग व सार्वजनिक विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही झाली असून लवकरच ही इमारत सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं. ८१८०९२७५७२
Back to top button