बीड
खराशीत महाप्रसादानंतर उलटी-जुलाबाचा उद्रेक! गावात आरोग्य यंत्रणा अलर्टवर; १२० रुग्णांवर उपचार

खराशीत महाप्रसादानंतर उलटी-जुलाबाचा उद्रेक!
गावात आरोग्य यंत्रणा अलर्टवर; १२० रुग्णांवर उपचार
५० रुग्ण पालांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल; तीन गर्भवती महिलांना जिल्हा रुग्णालयात हलविले, आमदारांसह आरोग्य अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव!
दै, सूर्योदय:- निश्चल येनोरकर
भंडारा : खराशी गावात महाप्रसादानंतर अचानक उलटी-जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे. गायत्री माता मंदिरातील महाप्रसादाचे भोजन केल्यानंतर अनेक नागरिकांची प्रकृती बिघडल्याने गावात अन्न विषबाधेचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तातडीने गावात विशेष आरोग्य शिबिर सुरू केले असून, २१ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे १२० रुग्णांवर उपचार करण्यात आले. यापैकी अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तीन गर्भवती महिलांना पुढील उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय पथके आणि लोकप्रतिनिधींनी परिस्थितीचा आढावा घेतला असून, बाधित रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे.
खराशी हे गाव प्राथमिक आरोग्य केंद्र मुरमाडीअंतर्गत येते. २० ऑक्टोबर रोजी गावातील गायत्री माता मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुमारे ७०० ते ८०० नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास काही नागरिकांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. एकापाठोपाठ अनेकांची प्रकृती बिघडू लागल्याने नागरिकांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. महाप्रसादानंतर एकाच वेळी अनेकांना त्रास सुरू झाल्याने अन्न विषबाधेचा संशय व्यक्त होत असून, नेमके कारण शोधण्यासाठी आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्र मुरमाडी येथील वैद्यकीय अधिकारी तसेच लगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविकांनी तातडीने खराशी गाव गाठले. गावात विशेष आरोग्य शिबिर सुरू करून बाधितांची तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले. २१ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे १२० रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. त्यापैकी २१ रुग्णांना ग्रामपंचायत कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात दाखल करून उपचार देण्यात आले, तर नऊ रुग्णांना ग्रामीण रुग्णालय, पालांदूर येथे पाठविण्यात आले. इतर रुग्णांची तपासणी करून आवश्यक औषधोपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
दरम्यान, सुमारे ५० रुग्णांना ग्रामीण रुग्णालय, पालांदूर येथे दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये तीन गर्भवती महिलांचाही समावेश असल्याने त्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेण्यात येत आहे. या तिन्ही महिलांना पुढील उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे संदर्भित करण्यात आले आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाने गावातील परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले असून, नव्याने लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी सर्वेक्षण आणि तपासणी सुरू ठेवण्यात आली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणा मैदानात; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी! जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीपकुमार गजभिये यांनी खराशी गाव तसेच ग्रामीण रुग्णालय, पालांदूर येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांची माहिती घेऊन त्यांनी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. बाधित रुग्णांवर वेळेत उपचार करणे, गंभीर रुग्णांना तातडीने मोठ्या रुग्णालयात संदर्भित करणे आणि गावातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवणे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. श्रीकांत अंबेकर आणि जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी अनिल बनकर हे देखील गावातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
अन्न विषबाधेचे नेमके कारण काय? नमुने तपासणीसाठी संकलित! खराशीतील या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी आरोग्य विभागाने अन्न, पाणी आणि रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महाप्रसादातील सात अन्ननमुने, पाण्याचे तीन नमुने आणि पाच रुग्णांचे शौच नमुने संकलित करण्यात आले आहेत. हे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची कार्यवाही सुरू असून, अहवालानंतरच नागरिकांच्या प्रकृती बिघडण्यामागील नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होईल. दरम्यान, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांमार्फत गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. उलटी-जुलाबाची लक्षणे असलेल्या नागरिकांची ओळख पटविणे, त्यांची तपासणी करणे आणि गरजेनुसार रुग्णालयात दाखल करणे, यावर विशेष भर देण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले आणि भंडारा-गोंदिया विधानपरिषद क्षेत्राचे आमदार अविनाश ब्रह्मणकर यांनी खराशी गाव तसेच ग्रामीण रुग्णालय, पालांदूर येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बाधित नागरिकांना योग्य उपचार मिळत आहेत का, याची माहिती घेत रुग्णांच्या आरोग्याबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यात आली. दुसरीकडे, खराशी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि पदाधिकारी यांनीही आरोग्य विभागाला सहकार्य केले असून, गावातील नागरिकांना आवश्यक मदत मिळावी यासाठी समन्वय साधला जात आहे.
महाप्रसादानंतर उद्भवलेल्या या आरोग्य संकटामुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले, तरी आरोग्य विभागाने तातडीने उपचार, रुग्णांचे संदर्भन, घरोघरी सर्वेक्षण आणि नमुना तपासणी अशा उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनी उलटी-जुलाबासारखी लक्षणे आढळल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. अन्न आणि पाण्याच्या नमुन्यांचे तपासणी अहवाल आल्यानंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, सध्या आरोग्य यंत्रणेचे संपूर्ण लक्ष बाधित रुग्णांवर उपचार करणे आणि परिस्थितीवर नियंत्रण राखण्यावर केंद्रित आहे.



