📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आई नवसाई देवी मंदिराचा भूमिपूजन सोहळा व कीर्तन महोत्सव उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती लाभणार

आई नवसाई देवी मंदिराचा भूमिपूजन सोहळा व कीर्तन महोत्सव उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती लाभणार

बीड (प्रतिनिधी) : श्रीक्षेत्र जरूड (ता. जि. बीड) येथे आई नवसाई देवी मंदिराच्या भव्य बांधकामाचा शुभारंभ भूमिपूजन सोहळ्याने करण्यात येणार असून, या पवित्र सोहळ्याचे आयोजन अत्यंत भक्तिभावाने करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविकांसाठी हा सोहळा विशेष आकर्षण ठरणार असून संत-महंतांच्या आशीर्वादाने व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.
गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ वाजता सर्व भाविकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी ९ ते ११ या वेळेत पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळांकडून सुरेल भजनांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. सकाळी ११ वाजता हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या सोहळ्याला मराठा संघर्षयोद्धा मा. श्री. मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. संत-महंतांच्या आशीर्वादामुळे या सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होणार आहे.
कीर्तनासाठी ह.भ.प. रामायणाचार्य गणेश महाराज लोंढे (माऊलीदादा वारकरी शिक्षण संस्था, भेंडटाकळी) यांचे प्रभावी कीर्तन होणार असून, त्यांच्या वाणीतील आध्यात्मिक संदेशातून भाविकांना भक्तिरसाचा अनुभव घेता येणार आहे.
ह. भ. प. नवसाई कृपांकित युवकीर्तनकार माऊली महाराज जरूडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा पार पडणार असून, त्यांच्या प्रेरणेमुळे कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक अधिष्ठान लाभणार आहे.
या कार्यक्रमासाठी गावातील तसेच परिसरातील सेवाभावी व्यक्तींनी उत्स्फूर्त सहकार्य केले आहे. भंडारा, पाणी व्यवस्था, कीर्तन सोहळा तसेच इतर नियोजनात ग्रामस्थांचा मोठा सहभाग राहिला आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त जरूड ग्रामस्थांनी व्यापक तयारी केली असून, सर्व भाविकांनी या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून भूमिपूजन, कीर्तन महोत्सव व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button