📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावरून आमदार सुरेश धस यांचे दुष्काळाबाबत शेतकऱ्यांना आश्वासक आवाहन

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावरून आमदार सुरेश धस यांचे दुष्काळाबाबत शेतकऱ्यांना आश्वासक आवाहन
‘दुष्काळाच्या संकटात चुकीचा निर्णय घेऊ नका, एक फोन सुरेश धसला करा’; मदतीसाठी २४ तास तत्पर
मायंबा हे स्फूर्तिस्थान; गडावर राजकीय भाष्य करणार नाही, पुढील वर्षापासून आदल्या दिवशी दसरा मेळावा उपक्रम
श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड हे लोहचुंबकासारखे असून, एकदा या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. हे केवळ धार्मिक स्थळ नसून स्फूर्ती देणारे स्थान आहे. त्यामुळे या पवित्र व्यासपीठावर कोणतेही राजकीय भाष्य केले नाही आणि यापुढेही करणार नाही. राजकीय विचार मांडण्यासाठी अन्य व्यासपीठे आहेत, अशी स्पष्ट भूमिका आमदार सुरेश धस यांनी दसरा मेळाव्यात मांडली. तसेच पुढील वर्षापासून विजयादशमीच्या आदल्या दिवशी शस्त्रपूजन करून दसरा मेळावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी आगामी काळातील दुष्काळाच्या संभाव्य तीव्रतेविषयी चिंता व्यक्त करताना आमदार धस यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. येणाऱ्या काळात दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता असल्याने प्रत्येक कुटुंबातील कर्त्या व्यक्तीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अनावश्यक खर्च टाळावा आणि आर्थिक नियोजन करावे, असे ते म्हणाले.
दुष्काळाच्या काळात केवळ माणसांचाच नव्हे, तर वन्यजीव आणि पशुधनाचाही विचार करणे गरजेचे आहे. या मुक्या जीवांना वाचविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. संकटाचा सामना करताना कोणीही एकटे पडू नये, यासाठी शासन आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आवश्यक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘दुष्काळावर एकजुटीने मात करू’
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न केले जातील. जाणता राजा म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सदैव उभे असून आष्टी विधानसभा मतदारसंघातील जनतेने दुष्काळाच्या संकटामुळे हतबल होण्याची गरज नाही. आपण सर्वांनी एकजुटीने या परिस्थितीचा सामना करायचा आहे. संकटाच्या काळात भावनेच्या भरात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. अडचणीत असाल, तर एक फोन सुरेश धस यांना करा. तुमच्या मदतीसाठी मी २४ तास उपलब्ध आहे, अशा शब्दांत आमदार धस यांनी शेतकरी आणि नागरिकांना धीर दिला.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी संयम राखावा, परिस्थितीचा विचार करून योग्य निर्णय घ्यावेत आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाताना टोकाचे पाऊल उचलू नये, हा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
Back to top button