बीड

श्रीवर्धनमध्ये  स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी; लघुउद्योगांना मिळणार गती

श्रीवर्धनमध्ये  स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी; लघुउद्योगांना मिळणार गती

श्रीवर्धन (संदेश घोलप): श्रीवर्धन शहरात नगराध्यक्ष अतुल चौगुले यांच्या पुढाकारातून स्थानिकांसाठी रोजगारनिर्मितीचे मोठे पाऊल उचलण्यात येणार  असून शहरातील बेरोजगारी कमी करून युवकांना आपल्या गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध लघुउद्योग प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. येत्या काही महिन्यांत हे उद्योग प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता वर्तविली असून, त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योगवाढीवर भर दिला आहे. श्रीवर्धन परिसरातील उपलब्ध संसाधने, पर्यटनाची क्षमता आणि स्थानिक कौशल्ये लक्षात घेऊन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग उभारण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे. विशेषतः प्रक्रिया उद्योग, गृहउद्योग, पर्यटनाशी संबंधित व्यवसाय, मत्स्यव्यवसाय पूरक उद्योग तसेच महिलांसाठी स्वयंसहाय्यता गटांमार्फत उद्योग अश्या विविध लघु उद्योग उभारणीवर भर देण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत स्थानिक युवकांना प्रशिक्षण, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधला जाणार आहे. शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या, जागा उपलब्धता, वीज व पाणीपुरवठा यांसारख्या पायाभूत सुविधांबाबत प्रशासनाकडून सकारात्मक सहकार्य दिले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. “श्रीवर्धनमधील युवकांना रोजगारासाठी बाहेरगावी जावे लागू नये, हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक स्तरावर उद्योग वाढले तर आर्थिक प्रगतीसोबतच सामाजिक स्थैर्यही मजबूत होईल.” त्यांनी नागरिकांनीही या उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे
या निर्णयामुळे शहरातील तरुणांना मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक तरुणांनी उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. लघुउद्योगांना मिळणारी ही नवी गती श्रीवर्धनच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. आगामी काळात रोजगारनिर्मितीचे ठोस परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Back to top button