बीड

तीर्थरूप महाराष्ट्र भूषण आदरणीय श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त धारवली गावात भव्य वृक्षारोपण; होळी सणाला पर्यावरणपूरक रूप

तीर्थरूप महाराष्ट्र भूषण आदरणीय श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त धारवली गावात भव्य वृक्षारोपण; होळी सणाला पर्यावरणपूरक रूप

श्रीवर्धन (संदेश घोलप): होळी सणाचे औचित्य साधत तसेच तीर्थरूप महाराष्ट्रभूषण आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीवर्धन तालुक्यातील धारवली गावात भव्य आणि प्रेरणादायी वृक्षारोपण उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सामाजिक, आध्यात्मिक आणि पर्यावरणीय जाणिवांचा संगम घडवत ग्रामस्थांनी सणाला पर्यावरणपूरक रूप देत एक आदर्श निर्माण केला.
उपक्रमाची सुरुवात नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.  त्यांच्या समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती, स्वच्छता, सेवा आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्याची यावेळी आठवण काढण्यात आली. “समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा” हा त्यांचा संदेश अंगीकारत गावकऱ्यांनी वृक्षारोपणाचा संकल्प केला.गावातील ज्येष्ठ नागरिक,  युवक मंडळ, विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. होळीचा माळरान , शाळा परिसर, सार्वजनिक रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या जागांवर विविध प्रजातींची फळझाडे व सावलीची झाडे लावण्यात आली. आंबा, जांभूळ, कडुलिंब, पिंपळ, अशोक यांसारख्या रोपांची लागवड करण्यात आली.वाढते तापमान, बदलते हवामान, भूजल पातळीतील घट आणि प्रदूषण यांसारख्या गंभीर समस्यांचा विचार करून वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे यावेळी नमूद केले. “एक सण – एक वृक्ष” तसेच “आज एक रोप, उद्या हिरवे गाव” असा संदेश देत प्रत्येक कुटुंबाने किमान एक तरी वृक्ष लावण्याचा निर्धार व्यक्त केला.
फक्त वृक्षारोपण न करता त्यांचे संगोपनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करण्यात आले. लावलेल्या प्रत्येक रोपासाठी जबाबदार व्यक्ती निश्चित करण्यात आली असून नियमित पाणी देणे,आणि देखभाल यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. काही स्वयंसेवकांनी पुढील एक वर्ष रोपांच्या वाढीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
या उपक्रमामुळे धारवली गावात हरित चळवळीला नवे बळ मिळाले असून पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा आदर्श निर्माण झाला. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि सकारात्मक विचारांमुळे गाव विकासाच्या आणि पर्यावरण रक्षणाच्या दिशेने ठाम पावले टाकत असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले.
धारवली गावातील या स्तुत्य आणि भव्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहिमा राबविण्याचा संकल्प ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक केशव पवार, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत बाजी पवार, शशिकांत मारुती सावंत,मा. सरपंच जगन्नाथ चाळके, प्रकाश पवार, नितीन पवार आदी मान्यवर उपस्थित राहून वृक्षारोपण केले.
Back to top button