
मंद्रूप गावात भक्तीची श्रावण सरी बरसली..
द. सोलापूरच्या भीमा- सिना खोऱ्यात वसलेल्या बारा महिने सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या मंद्रूप गावात दुसरा श्रावण सोमवार निमित्त लोकसेवा विद्यामंदिर व क. महाविद्यालय मंद्रूपच्या वतीने काढण्यात आलेल्या ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवाची भक्तीची दिंडीमध्ये विविध कलागुण प्रदर्शनाने बालगोपाळांच्या श्रीमुखाने श्री मल्लिकार्जुन महाराज की जयजयकाराने दुमदुमून गेली.
सालाबादाप्रमाणे श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी गावातून श्री मल्लय्या देवाची पालखीचे प्रशालेच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपात मिरवणूक निघत असते.
त्यामुळे यावर्षीही या मिरवणुकीमध्ये शिवप्रतिमेची रांगोळी, शंकर, पार्वती, गणपती, नंदी, अहिल्यादेवी होळकर आदींच्या रुपाने सजलेले मुले, दिंडी ,महाकाल अघोरी शिव तांडव नृत्य, भरतनाट्यम्, फुगडी,ढोल, झांज, टिपरी नृत्य, बहारदार लेझीम, वीरभद्र पुरवंत, कुंभमेळा, नंदीध्वज तसेच शासनाच्या उपक्रमांतर्गत ‘एक पेड माॅ के नाम’वृक्षदिंडी, साक्षरता घोषवाक्याद्वारे प्रचार प्रसार, पारंपारिक टाळ, सनई, हलगी, संबळ वाद्य आणि शालेय बँड पथक तथा शिस्तीचे पाईक असणारे NCC टिम आदी सर्वांगीण घटकांच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणात विविध कलाकुसराने संपूर्ण गाव नाहून गेले. यात लोकांचे आकर्षण ठरले ते लहान मुलांनी अतिशय सुंदरतेने केलेले महाकाल शिवतांडव अघोरी नृत्य. या अघोरी नृत्याचे सुंदर चित्रण गावकऱ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपत होते.
अशा या सुंदर कार्यक्रमास द. सोलापूर पं.स.चे मा. सभापती श्री गुरुसिद्ध मामा म्हेत्रे साहेब, माजी युवा सरपंच तथा संस्थेचे सहसचिव श्री अप्पासाहेब म्हेत्रे, नागनाथ म्हेत्रे, माजी केंद्रप्रमुख शंकर म्हेत्रे, अनंत म्हेत्रे, वाघीश म्हेत्रे, राजकुमार कुंभार मालक, वेदमूर्ती करबसय्या स्वामी, प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री बसवराज कुमठेकर सर, पर्यवेक्षक श्री मदगोंडा मलकारी सर, माजी ग्रा.पं. सदस्य बसप्पा घाटे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद घाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आदींनी परिश्रम घेतले. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी या दिंडी मिरवणुकीत सहभागी झाले होते.



