राजकीय

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची थेट भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना धमकी.

 

वाढती महागाई तसेच केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे यावरून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भाजपवर टीका करताना जीभ चांगलीच घसरली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर अनावश्यक टीका केल्यास त्यांची जीभ छाटून टाकू असं वक्तव्य तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केलं आहे.

हैदराबादमध्ये बोलत असताना चंद्रशेखर राव यांनी भाजपविरोधात अत्यंत आक्रमक भूमीका घेताना दिसून आले. यावेळी त्यांनी आमच्यावर अनावश्यक टीका करू नका म्हणत भाजप कार्यकर्त्यांना धमकावले. तसेच तिकडे चीन अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्यावर हल्ला करतंय आणि केंद्र सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारलाही धारेवर धरलं आहे.

ते असेही म्हणाले की, तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देऊ. भाजपने ७ वर्षात काय केले? भारताचा जीडीपी बांगलादेश, पाकिस्तानपेक्षा कमी आहे आणि केंद्राने विनाकारण कर वाढवला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबद्दल देखील केंद्र सरकार खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. २०१४ मध्ये कच्च्या तेलाच्या किमती १०५ यूएस डॉलर होत्या आणि आता ८३ यूएस डॉलर आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्या असल्याचे सांगत भाजप जनतेशी खोटं बोलल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

Back to top button