पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी सोनेसांगवी फाट्यावर पारधी वस्तीवरील नागरिकांचा रास्ता रोको !

पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी सोनेसांगवी फाट्यावर पारधी वस्तीवरील नागरिकांचा रास्ता रोको !
अहिल्या नगर:-शेवगाव तालुक्यातील सोने सांगवी येथील पारधी वस्तीवरील नागरिकांना गेले अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी नसल्याकारणाने त्यांनी शेवगाव- गेवराई राज्य मार्गावर गावचे जेष्ठ नागरिक आप्पासाहेब मडके यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दि २६ रोजी ‘ रास्ता रोको’ आंदोलन करून पाण्याच्या टँकरची मागणी केली!
येथील पारधी वस्तीवर गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई चालू आहे. विहिरी, तलाव आटल्याने येथील नागरिकांना पाणी टँकर शिवाय पर्याय नाही. त्यामुळे नागरिकांनी सोने सांगवी ग्रामपंचायतीचा पाणी टँकर सुरू करण्यासंदर्भाचा ठराव एका महिन्यापूर्वी शासनाकडे दाखल केला होता. परंतु शासनाचे काम आणि सहा महिने थांब ह्या उक्ती प्रमाणे त्यांनाही या लाल फितीच्या कारभाराला सामोरे जावे लागले. शेवटी आज शेवगाव – गेवराई राज्य मार्गावर सोने सांगवी फाट्यावर ‘रास्ता रोको’ केल्याच्या नंतर त्यांना शेवगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी अजित बांगर यांनी दोन दिवसात पाण्याचे टँकर असे लेखी आश्वासन दिल्याच्या नंतर हा ‘ रास्ता रोको’ मागे घेण्यात आला. तसा आदेश त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मोबाईल वर टाकला.
सकाळी नऊच्या सुमारास सुमारे १५० ते २०० पारधी नागरिकांनी यावेळी या रोडवर पाण्याचे रिकामे हंडे, पाण्याचे रिकामे पातेले घेऊन सुवाद्य असे ‘ रास्ता रोको’ आंदोलन केले.
यावेळी शेवगाव पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस प्रशासनाच्या वतीने चंद्रकांत कुसारे, संतोष वाघ, नाना गर्जे यांनी चूक बंदोबस्त ठेवून पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व आंदोलन कर्ते यांच्यामध्ये समेट घडून आणला.
यावेळी आप्पासाहेब मडके अरुण आंधाळे, साईनाथ पवार, भगिनाथ पवार, अनिल काळे , श्रीमती सिंधुबाई पवार, श्रीमती कल्पना पवार , श्रीमती लक्ष्मी जॉनराव, लक्ष्मण चव्हाण, राजु चव्हाण, अनिल काळे ,संदिप पिंपळे, नामदेव काळे ,श्रीमंत जगधने, विश्वास पवार ,अकुंश पवार यांच्यासह अनेक महिला पुरुष व अबावृद्ध या आंदोलनात सहभागी झाले होते.
चौकट
अहिल्यानगर चे जिल्हाधिकारी यांनी पाणी टंचाईच्या संदर्भात तत्काळ पाणी टँकर उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असतांना मात्र येथील वस्तीवरील नागरिकांना गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याच्या टँकर साठी संघर्ष करावा लागत आहे.
चौकट
तालुक्यामध्ये पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रशासनाने मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवली.
वास्तविक गतिमान प्रशासनाचे काम कासवाच्या गतीने आपली पावले उचलत आहे. एकीकडे पाणी ठेकेदार अमरापूरच्या पाणी उद्भावावर वीज नाही म्हणून पाण्याच्या खेपा होत नाहीत. तर दुसरीकडे तालुक्यातील पूर्व भागातील जनता पाण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे



